
पवईतील वन उद्यानमधून (फॉरेस्ट गार्डन) बांधण्यात येणाऱया डीपी रोडला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. या डीपी रोडच्या बांधकामामध्ये सुमारे 222 झाडे बाधित होणार असल्याचे सर्वेक्षण विभाग व उद्यान विभाग एस विभाग यांच्या अहवालातून समोर आल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सुरक्षा बंधन आंदोलन पुकारले. या आंदोलनात पवईतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत डीपी रोडला तीव्र विरोध केला.
पवई प्रभाग क्रमांक 122 मधील प्रमोद महाजन वन उद्यानाच्या जागेतून खासगी बिल्डरच्या प्रकल्पाकरिता डीपी रोड प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या डीपी रोडला शिवसेना उपविभागप्रमुख नीलेश साळुंखे यांनी विरोध केला आहे. हे उद्यान वाचवण्यासाठी शिवसेनेने ‘सेव्ह फॉरेस्ट गार्डन’ ही चळवळ सुरू केली. जोपर्यंत डीपी रोड रद्द होत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवणार असल्याचा इशारा साळुंखे यांनी दिला आहे. दरम्यान, शिवसेनेचे आंदोलन आणि दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे व सहाय्यक आयुक्त (एस विभाग) समरीन सय्यद यांनी फॉरेस्ट गार्डनची पाहणी केली.


























































