अंमली पदार्थ तस्करीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक, एमआयडीसी पोलिसांकडून 37.17 कोटींचे केटामाइन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंधेरी पूर्व येथील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळ 24 आणि 25 सप्टेंबरच्या मध्यरात्री संशयितांच्या सामानाची झडती घेतली असता, त्यांच्याकडे 12 किलो 390 ग्रॅम केटामाइन सापडले. या केटामाइनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 37.17 कोटी रुपये इतकी आहे. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींनी हे अमली पदार्थ ॲल्युमिनियमच्या फरसाण आणि चिवड्याच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवले होते आणि ते थायलंडला पाठवण्याच्या तयारीत होते.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अदनान अहमद नियाज अहमद सिद्दीकी (35) आणि सौद मुश्ताक मनियार (29) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी रात्री 11 च्या सुमारास हे दोघे अंधेरी-कुर्ला रोडवरून साकीनाक्याच्या दिशेने सामान घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. गस्त घालणाऱ्या पथकाने त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.