वसईत डम्पिंगला आग; धुराच्या लोटांमुळे नागरिक हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोखिवरे-भोयदापाडा येथील वसई-विरार महापालिकेच्य डम्पिंगला रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या धुरामुळे नागरिक हैराण झाले.

भोयदापाडा येथे महापालिकेची कचराभूमी असून सुमारे 40 एकर परिसरात ती विस्तारलेलं आहे. वसई-विरार शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातून दररोज सुमारे 850 टनांहून अधिक कचरा या ठिकाणी टाकला जातो. दरम्यान रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कचराभूमीतील साचलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये विविध प्रकारचे ज्वलनशील घटक तसेच जैविक पदार्थ साचल्याने आग भडकली असण्याची शक्यत होती.

या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम सुरू केले. जवानांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून धूर बराच काळ निघत होता.