Jammu Kashmir- पुंछ-राजौरीत दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई; 12 हून अधिक ठिकाणी सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमधील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांत दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी आज (२९ सप्टेंबर) मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांबाबत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील 12 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम राबवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांकडून संशयितांची घरे, विविध ठिकाणे आणि जंगलालगतच्या परिसराची तपासणी केली जात आहे. संशयास्पद हालचाली आणि दहशतवाद्यांचे संभाव्य अड्डे शोधण्यावर भर दिला जात आहे.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार पुंछ आणि राजौरी हे भाग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जातात. घनदाट जंगले आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत दहशतवादी संघटना या भागात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुरक्षा दलांनी शोधमोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. या मोहिमेत लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे जवान सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यातही जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी सुमारे 25 दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवली होती. यामध्ये चार स्थानिक आणि 21 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. राजौरी, पुंछपासून कठुआपर्यंतच्या जंगलांमध्ये त्यांचा शोध सुरू होता.

चार स्थानिक दहशतवाद्यांपैकी तिघे जुने असून, त्यांचा संबंध हिज्बुल मुजाहिदीनशी असल्याचे सांगण्यात आले. किश्तवाड परिसरात सक्रिय असलेला जहांगीर सरूरी आणि त्याच्या गटाचाही त्यात समावेश आहे. तर निक्कू नावाने ओळखला जाणारा आणखी एक स्थानिक दहशतवादी कठुआ आणि उधमपूरदरम्यानच्या परिसरात सक्रिय असल्याची माहिती आहे.
2026 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाया सातत्याने सुरू आहेत. 1 जानेवारी ते 22 सप्टेंबरदरम्यान जम्मू विभाग, काश्मीर खोरे आणि नियंत्रण रेषेवर विविध मोहिमा राबवण्यात आल्या. या काळात वेगवेगळ्या चकमकी आणि घुसखोरीविरोधी कारवायांमध्ये किमान 15 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू विभागात दहशतवाद्यांविरोधातील कारवायांना वेग आला होता. 23 जानेवारी रोजी कठुआ जिल्ह्यातील बिलावरच्या परहेतर परिसरात सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा पाकिस्तानी दहशतवादी उस्मान ऊर्फ अबू माविया ठार झाला होता.