
अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथे हिंदुस्थान-म्यानमार सीमेवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात आसाम रायफल्सचा एक जवान शहीद झाला आहे. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. नामपोंग सर्कल अंतर्गत नामपोंग नाला जवळ मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 21 व्या आसाम रायफल्सचे जवान ज्या सीमा कुंपणाचे काम सुरू होते, तिथे गस्त घालत होते. गस्तीवर असताना संशयित दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यात एक जवान शहीद झाला तर चार जवान जखमी झाले. जानखोकाई कुकी (42) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. जखमी जवानांना उपचारासाठी हलवण्यात येत आहे.
या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. प्राथमिक तपासात एनएससीएन-के-वायए (युंग आंग गट) शी संबंधित दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळते. मात्र, हल्लेखोरांच्या ओळखीबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आसाम रायफल्सकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.

























































