
एसआयआर आणि मतदार याद्यांमधील घोळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मतदार यादीतून वगळण्यात आलेली १३ कोटींहून अधिक नावे तात्काळ पूर्ववत करण्यात यावीत’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंगळवारी नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदार यादीतील गैरप्रकार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत (SIR) देशभरातील तब्बल १३ कोटी मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. ही सर्व नावे तातडीने मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करावीत, अशी मागणी जयराम रमेश केली आहे.
निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणीसाठी असलेल्या फॉर्म ६ मध्ये केलेले बदल पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे. नियम बदलण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला संसदेच्या माध्यमातून असताना, आयोगाने हे बदल केल्याने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या Gen Z म्हणजेच युवा मतदारांच्या नोंदणी प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, खुद्द इतर दोन निवडणूक आयुक्तांनी त्यांच्या निर्णयांवर आणि कामकाजावर आक्षेप नोंदवल्याचा दावा रमेश यांनी केला आहे. दरम्यान, नागरिकांच्या मतदानाच्या घटनात्मक अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि निवडणूक आयोगाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी देशभरात आक्रमक निदर्शने सुरू केली आहेत.




























































