
आदिवासी विकास विभागातील अनागोंदी, भ्रष्ट कारभार, वसतिगृहांमधील असुविधा याविरुद्ध विद्यार्थ्यांनी उठाव केला आहे. मंत्री अशोक ऊईके यांनी राजीनामा द्यावा, सेंट्रल किचन बंद करावे यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी ‘जेन झी’ने सोमवारी नाशिक ते मुंबई पायी लाँग मार्च सुरू केला आहे. पोलिसांचा मनाई हुकूम झुगारून शेकडो विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.
आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी राजीनामा द्यावा, गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी, तर जखमी विद्यार्थिनींना प्रत्येकी पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी 18 ऑगस्टपासून म्हणजे तब्बल 42 दिवस विद्यार्थ्यांनी नाशिकच्या ईदगाह मैदानावर ठिय्या आंदोलन केले. तीन विद्यार्थ्यांनी तेरा दिवस उपोषण केले. मंत्री ऊईके यांनी दोन वेळा चर्चा केली. मात्र, मागण्या मान्य केल्या नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 2 सप्टेंबरला या आंदोलकांनी भेट घेतली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी 3 सप्टेंबर रोजी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनीही भेट घेतली होती.
पोलिसांचा मनाई आदेश झुगारून सोमवारी शेकडो आदिवासी विद्यार्थी पायी लाँग मार्चने मुंबईकडे निघाले आहेत. सहा ते सात दिवसात ते राजभवनावर धडकणार आहेत. आदिवासी मंत्रालयाचे सचिव, आदिवासी विकास आयुक्तांची बदली करावी; राज्यातील सर्व आश्रमशाळांना सोयीसुविधा द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. सोनू गायकवाड, जयेश ठाकरे, विवेक गावीत, विकी मुंजे, जीवन भोये यांना ताब्यात घेतले आहे.
मंत्री झिरवाळ यांना धारेवर धरले
लाँग मार्चने निघालेल्या या विद्यार्थ्यांची मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. चर्चेदरम्यान त्यांच्यात वाद झाला. आमच्या कुठल्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत, सरकार दुर्लक्ष करते, प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, असे सांगत आंदोलकांनी झिरवाळ यांना धारेवर धरले.



























































