
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या एसटी महामंडळाची पुढील 10 वर्षांनंतर ‘ई-लालपरी’ ही नवीन ओळख तयार होणार आहे. 2037पर्यंत एसटीच्या ताफ्यात सर्व इलेक्ट्रिक बसेस असणार आहेत. नजीकच्या काळात दाखल होणाऱया 5 हजार बसेस शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे. पुढील वर्षापासूनच जुन्या गाडय़ांचे इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतर केले जाणार आहे.
एसटीच्या मुख्यालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या वेळी संचालक मंडळाचे सदस्य आणि महामंडळाचे खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत एसटी ताफ्याचे आधुनिकीकरण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.



























































