
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ‘रेबीजमुक्त मुंबई’ अभियानाला मोठे यश मिळाले असून 2025 मध्ये रेबीजमुळे एकही मृत्यू झाला नाही. 2030 पर्यंत ‘शून्य मृत्यू’चे उद्दिष्ट ठेवून सुरू केलेल्या ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पा’चा दुसरा टप्पा आज सुरू करण्यात आला.
मुंबईतील प्रत्येक महानगरपालिका प्रभागामध्ये पुरेशा आणि विशेष प्रशिक्षित मनुष्यबळासह स्वतंत्र रेबीज क्लिनिक स्थापन करण्याचा मानस महापौर तावडे यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रभागनिहाय क्लिनिकअंतर्गत रेबीज प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक लसीकरणाची अखंड सेवा 24 तास उपलब्ध राहील याचीही खबरदारी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
‘आपला दवाखाना’त रेबीज लस
पालिका क्षेत्रातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ येथे रेबीज प्रतिबंधक लस आणि सीरम उपलब्ध करून देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले.





























































