
एसटी महामंडळाची ‘एनसीएमसी’ कार्ड योजना सवलतधारक प्रवाशांच्या हक्कावर गदा आणत असतानाच पंत्राटदार खासगी कंपनीसाठी फायद्याची ठरत आहे. ‘एनसीएमसी’ कार्डमधील प्रवाशांच्या रिचार्जचे कोटय़वधी रुपये एसटी महामंडळाऐवजी ‘ई-बिक्सपॅश’ या खासगी पंपनीकडे जमा होत आहेत. तसेच पंपनीच्या प्रतिनिधींकडून अनधिकृतपणे अतिरिक्त शुल्कवसुली केली जात आहे. याला विरोध करीत शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्डची सक्ती केली आहे. या कार्डच्या रिचार्जमधून जमा होणारी संचित मूल्याची रक्कम पंत्राटदार ‘ई-बिक्सपॅश’ पंपनीकडे वर्ग होत आहे. राज्यात सहा कोटी सवलतधारक प्रवासी असून त्यातील 1.20 कोटी प्रवाशांनी ‘एनसीएमसी’ कार्ड घेतले आहे. सर्व कार्डधारक ‘एनसीएमसी’ कार्ड रिचार्ज करीत आहेत; परंतु, खासगी पंपनीच्या प्रतिनिधींकडून ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणीच्या निर्धारित 199 रुपयांच्या मूल्यापेक्षा अतिरिक्त 50 ते 100 रुपये शुल्काची वसुली केली जात आहे. त्याचबरोबर कोटय़वधी प्रवाशांच्या रिचार्जची रक्कम थेट खासगी पंपनीकडे जात असल्याने एसटी महामंडळाचे आर्थिक हित धोक्यात आले आहे, असे म्हणणे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे मांडले आहे.
2,500 कोटी कंपनीच्या ताब्यात जाण्याचा धोका
प्रवाशांनी वाहकाकडून 100 रुपयांचे रिचार्ज केल्यास प्रत्यक्षात कार्डवर 98.94 रुपये जमा होतात, तर खासगी एजंटकडून रिचार्ज केल्यास 11.80 रुपये कपात होऊन केवळ 87.14 रुपयेच कार्डवर जमा होतात. यातून ‘ई-बिक्सपॅश’ पंपनीला 11.80 रुपयांचा मोबदला मिळत आहे. यानुसार जर जवळपास पाच कोटी सवलतधारक प्रवाशांनी प्रत्येकी किमान 500 रुपये ‘एनसीएमसी’ कार्डमध्ये शिल्लक ठेवले तर एकूण संचित मूल्य अंदाजे 2,500 कोटी होऊ शकते. ही रक्कम खासगी पंपनीच्या ताब्यात जाईल याकडे खासदार सावंत यांनी लक्ष वेधले आहे.


























































