
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी उड्डाणपुलाच्या खर्चात 10 कोटी 87 लाखांची वाढ झाली आहे. खांब आणि बीमच्या मजबुतीच्या कामामुळे हा खर्च वाढला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचा एपूण खर्च 105 कोटी 53 लाखांवर गेला आहे. ‘व्हीजेटीआय’ आणि ‘आयआयटी मुंबई’कडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार वाढीव दुरुस्ती सुचवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंधेरी उड्डाणपुलाच्या संरचनात्मक मजबुतीकरण व दुरुस्तीचे मूळ कंत्राट 92 कोटी 67 लाख 34 हजार 887 रुपये इतके होते. मे. द. फ्रेस्सिनेट प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट कंपनीला 15 ऑक्टोबर 2024 रोजी पुलाच्या दुरुस्तीसाठी कार्यादेश देण्यात आला होता.
पुलाखाली, खांबांना कंपन
पुलावरून वाहनांची ये-जा सुरू असताना पुलाखाली आणि खांबांमध्ये कंपन निर्माण होत असल्याचे आढळले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार व्हीजेटीआय आणि आयआयटी मुंबईच्या तज्ञांनी 10 जून 2025 रोजी पुलाची संयुक्त संरचनात्मक तपासणी केली.
या तपासणीच्या अहवालानुसार पुलाचे खांब आणि बीम मजबूत करणे अत्यंत निकडीचे असल्याचे नमूद करण्यात आले. ही कामे न केल्यास मुख्य संरचनेला धोका निर्माण होऊन जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.


























































