
मुंबई-अहमदाबाद मार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. सकाळी तर सातिवली खिंडीत कंटेनर उलटल्याने तब्बल सहा किलोमीटरच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा व वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्त कंटेनर बाजूला हटवला. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
वसई पूर्व भागातून जाणाऱ्या या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी निर्माण झालेली उंच-सखल परिस्थिती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. महामार्गावर करण्यात आलेल्या व्हाईट टॉपिंगचे अनेक पॅनेल खचल्याने रस्त्यावर मोठे चढ-उतार निर्माण झाले आहेत. त्यातच अवजड वाहनांचा वेग अधिक असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत.
विरुद्ध दिशेने गाड्या घुसवल्या
पालघर तसेच तुंगारफाटा परिसरात रसायन वाहून नेणारा टँकर आणि दुधाचा टँकर काही दिवसांपूर्वी उलटला होता. या घटना ताज्या असतानाच आज सकाळी सातिवली खिंडीत गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कंटेनर पलटी झाला. कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी उलटल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली. दरम्यान वाहतूककोंडीचा फायदा घेत काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याने चिंचोटी परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही वाहतूककोंडी निर्माण झाली. त्यामुळे दोन्ही दिशेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.





























































