
नीरूने ‘ट्रप’मध्ये पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडविला. अंतिम फेरीत नीरूने 28 गुणांची कमाई करत आशियाई विक्रमही मोडीत काढला. यापूर्वीचा विक्रम 24 गुणांचा होता. नीरूच्या या सुवर्णवेधाने हिंदुस्थानी महिला ट्रप नेमबाजीच्या इतिहासात नवे पान लिहिले गेले. कारण या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी एकाही हिंदुस्थानी महिला ट्रप किंवा स्कीट नेमबाजाने वैयक्तिक पदक पटकावले नव्हते. नीरूने ही कोंडी फोडली.
अंतिम फेरीतही तिच्या नेमबाजीची धार कायम राहिली आणि 28 गुणांसह तिने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. नीरूने याच वर्षी जुलैमध्ये इटलीतील शॉटगन विश्वचषकात ट्रप प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. आता या सुवर्णपदकाने तिच्या झंझावाती कामगिरीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
सांघिक स्पर्धेतही रौप्यची भर
नीरूने आशियाई स्पर्धेत महिलांच्या ट्रप सांघिक स्पर्धेतही हिंदुस्थानला रौप्यपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. नीरूने 118, आशिमा अहलावतने 106 आणि मनीषा कीरने 104 गुण मिळवत एकूण 328 गुण नोंदवले. चीनने 346 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर कुवेतला 325 गुणांसह कांस्यपदक मिळाले. वैयक्तिक पात्रता फेरीत आशिमाला 16 वे, तर मनीषाला 23 वे स्थान मिळाले.
पुरुष संघाची निराशा; भरवसा शपथवर
दुसरीकडे पुरुषांच्या ट्रप सांघिक स्पर्धेत हिंदुस्थानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. हिंदुस्थानी संघाला दहापैकी सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले, मात्र शपथ भारद्वाजने अंतिम फेरीत धडक मारत हिंदुस्थानची आशा कायम ठेवली. मेरठच्या 24 वर्षीय शपथने पात्रता फेरीत आठवे स्थान मिळवले. शपथ, कायनान चेनाय आणि अहवर रिझवी यांनी मिळून 339 गुणांची नोंद केली. पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत कुवेतने 355 गुणांसह सुवर्णपदक, कतारने 349 गुणांसह रौप्य आणि कझाकस्तानने 348 गुणांसह कांस्यपदक पटकावले.

























































