आमचे लक्ष्य जनतेची फसवणूक करणारे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी निवडणुका आणि मतदार याद्यांमधील घोळाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बुधवारी एक अत्यंत महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट हल्लाबोल केला.

निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार आणि मतदार याद्यांमधील घोळाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की, “आमचे प्रमुख लक्ष्य हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, ज्यांनी देशातील जनतेची मोठी फसवणूक केली आहे.” त्यांच्या या विधानामुळे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि कार्यपद्धतीवर विरोधकांनी पुन्हा एकदा थेट प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सर्व विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेली १३ कोटींहून अधिक नावे आणि ईव्हीएम मधील तडजोडीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाविरोधात रान उठवले आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी ‘इंडिया आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडणार आहे.