क्रिकेटप्रेमींसाठी जणू सोनियाचा दिवस! एकाच दिवशी झळकली विक्रमी 6 शतके, ICC ची विशेष पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील प्रत्येक घरात एकतरी क्रिकेटवेडा चाहता पाहायला मिळतो. क्रिकेट जगतातील घडमोडींवर या चाहत्यांचा बारीक लक्ष असतं. आपल्या आवडत्या खेळाडूने धडाकेबाज कामगिरी केली की, चाहत्यांचा दिवस आनंदात जातो. अशा दिवसाची प्रत्येक चाहता वाट पाहत असतो. असाच एक दिवस उजाडला आणि त्या दिवशी एक नाही तर तब्बल सहा खेळाडूंनी शतके ठोकली. 27 सप्टेंबर (रविवार) हा दिवस क्रिकेट जगतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. ICC ने याची दखल घेत सोशल मीडियावर विशेष पोस्ट शेअर केली आहे.

वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी एकूण 6 शतके झळकावण्याचा विक्रम नोंदवला गेला. या शतकामध्ये विराट कोहलीच्या शतकाचाही समावेश आहे. ही सर्व सहा शतके हिंदुस्थान-वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड-श्रीलंका या तीन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये पाहायला मिळाली. या ऐतिहासिक दिवशी हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात तीन शतके पाहायला मिळाली. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 88 चेंडूत नाबाद 139 धावांची खेळी केली. याच सामन्यात कर्णधार शुभमन गिलने 109 चेंडूत 110 धावांचे योगदान दिले, तर वेस्ट इंडिजकडून खेळताना जस्टिन ग्रीव्सने 108 चेंडूत 101 धावांची शतकी खेळी साकारली.

इतर दोन सामन्यांमध्येही फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेत आफ्रिकेच्या टेम्बा बवुमाने 103 धावा आणि विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरने 93 चेंडूत 142 धावांची धडाकेबाज शतके ठोकली. तसेच, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या टॉम बैंटनने 105 चेंडूत 126 धावांची दणदणीत शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.