
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून ‘ज्ञानरंग ः ज्ञानेश्वरी’ या मोबाईल अॅपचे लोकार्पण 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजता प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या अॅपमुळे ज्ञानेश्वरी सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक सहजपणे पोहोचणार आहे. हे अॅप गुगल प्ले आणि अॅपल अॅप स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध होईल.
‘ज्ञानाचा अमृतसागर’ हे ब्रीद घेऊन आलेल्या या अॅपद्वारे माऊलींच्या ओव्या रोजच्या जीवनात ऐकता, वाचता आणि समजून घेता येतील. या अॅपची संकल्पना व्हॅल्युएबल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे यांची आहे. याच सोहळय़ात डॉ. भागवत यांच्या हस्ते श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांसह ‘संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण’ यूटय़ुबवर प्रसारित केले जाईल. या उपक्रमाची संकल्पना आणि श्रीमद्भगवद्गीता वाचन रेणुका देशकर यांचे आहे. श्रीमद्भगवद्गीता वाचन श्रीनिवास वेर्णेकर यांनी केले असून ध्वनीमुद्रण आणि संगीत शैलेश दाणी यांचे आहे. लोकार्पणापूर्वी ज्ञानेश्वरांच्या रचनांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमात प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि केतकी चैतन्य यांचे गायन, तर डॉ. संजय उपाध्ये यांचे निरूपण असेल. सूत्रसंचालन मिलिंद पुलकर्णी करतील.


























































