
हिंदुस्थानची महिला ट्रप शूटिंगपटू नीरू धांडाने आशिया क्रीडा स्पर्धेत अचूक नेमबाजीचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. नीरूच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे हिंदुस्थानचा तिरंगा आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अभिमानाने उंचावला.
नीरूच्या या सुवर्णयशात तिच्या मराठमोळय़ा फिजिओथेरपिस्ट अश्विनी पाटील यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. खेळाडूची शारीरिक तंदुरुस्ती, फिटनेस, रिकव्हरी आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी आवश्यक शारीरिक तयारी यासाठी अश्विनी पाटील यांनी पडद्यामागे सातत्याने मोलाची साथ दिली. नीरू धांडाचा अचूक सुवर्णवेध आणि अश्विनी पाटील यांची समर्थ साथ यामुळे या यशाला एक विशेष पैलू लाभला आहे. नीरूच्या शानदार सुवर्ण कामगिरीबद्दल तसेच त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या फिजिओथेरपिस्ट अश्विनी पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. अश्विनी पाटील यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे वडील, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबईचे उपाध्यक्ष जीवन पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचेही अभिनंदन करण्यात येत आहे.

























































