ती आजारी होती, पण… रुग्णालयातून रेंजवर अन् रेंजवरून नीरूने इतिहास रचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीर साथ देत नव्हतं. सरावाची गाडी जवळपास तीन आठवडे रुळावरून घसरली होती. पाच दिवस पोटात अन्नाचा कणही नव्हता. रुग्णालयाच्या खाटेवर पडलेल्या नीरू धांडाला आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताही येईल की नाही अशी परिस्थिती होती, पण जिथे दुसरा खेळाडू कदाचित स्पर्धेतून माघार घेईल अशी परिस्थिती होता. तिथे नीरूने आजारालाच आव्हान दिलं आणि मग आली 29 सप्टेंबरची ती सकाळ. नियतीने नीरूसाठी वेगळीच पटकथा लिहिली होती आणि ती जगासमोर नीरूने उभी केली. इतिहास घडवला.

आयचीच्या शूटिंग रेंजवर पावसाचा मारा सुरू होता. हवामानाचा लहरीपणा, अंतिम फेरीचा प्रचंड दबाव आणि अनेक आठवडे खंडित झालेला सराव. सगळं काही नीरूच्या विरोधात होतं, पण तिच्या हातात होती बंदूक आणि डोळय़ांसमोर एकच लक्ष्य.

पहिल्या सीरिजमध्ये तिने पाचपैकी पाच निशाणे मारले. एका क्षणी एक निशाणा चुकला आणि नीरू आघाडीवरून खाली घसरली. पण ती डगमगली नाही. पुढच्या क्षणी बंदूक पुन्हा खांद्यावर घेतली. नजर पुन्हा लक्ष्यावर आणि ट्रिगर दाबला गेला. निशाणा फुटला. एकामागून एक लक्ष्य भेदत नीरू पुन्हा सुवर्णाच्या शर्यतीत धडधडत परतली. अंतिम फेरी संपली तेव्हा स्कोअरबोर्डवर चमकत होतं. 30 पैकी 28 अचूक निशाणे. चीनची सुन युनोंग 26 गुणांवर थांबली, तर कुवेतची हाजर अब्दुलमलिक 21 गुणांसह तिसरी आली. नीरूने सुवर्णासोबत आशियाई विक्रमही मोडला. नीरू धांडा सुवर्णविजेती ठरली.

आजारावर मात करून, सरावाच्या तुटलेल्या साखळय़ा तोडून आणि दबावाला चिरडून तिने हिंदुस्थानसाठी इतिहास रचला. महिलांच्या ट्रपच्या वैयक्तिक प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे पहिले सुवर्ण ठरले. रुग्णालयातील खाटेपासून सुवर्णपदकापर्यंतचा हा प्रवास म्हणजे नीरू धांडाच्या जिद्दीची, संयमाची आणि मानसिक ताकदीची थरारक कहाणी होती. नीरू आजारी होती, पण तिचा निशाणा अजिबात आजारी नव्हता.