
सचिन सावरीकर
सध्या जगभरातील लाखो अनिवासी भारतीय व्यक्ती आपला बहुतांश पैसा भारतात गुंतवतात. याउलट भारतामधून परदेशात गुंतवणूक करण्यावर फारसा भर दिला जात नाही. भारतातूनच नियंत्रित असलेल्या यंत्रणेद्वारे अनिवासी भारतीयांना जागतिक पातळीवर गुंतवणूक करणे शक्य होण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत, परंतु गिफ्ट सिटीमध्ये नोंदणीकृत असलेले आणि डॉलरच्या स्वरूपात असणारे जागतिक फंड ही त्रुटी दूर करण्यास मदत करू शकतात.
अमेरिकेत कार्यरत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उच्चपदस्थ व्यावसायिक आहेत. अमेरिकेत असल्यामुळे साहजिकच त्यांची सर्व कमाई डॉलरमध्ये आहे. जेव्हा ते आपली कमाई भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करतात त्यावेळी त्यांना जास्त रुपये मिळतात. साहजिकच आपण श्रीमंत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य एकेकाळी 70 रुपयांच्या आसपास होते, त्याने आता 95 रुपयांचा पल्ला ओलांडला आहे. आपण आणखी एक उदाहरण पाहू या. लंडनमध्ये वित्तीय क्षेत्रात काम करणारे एक उच्चपदस्थ व्यावसायिक आहेत. त्यांचाही अनुभव पटेल यांच्यासारखाच आहे. एकेकाळी सुमारे 92 रुपयांना विकल्या जाणाऱ्या पाऊंड्सचे मूल्य आता सुमारे 130 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. सध्या भारतात रेमिटन्सेसच्या माध्यमातून पाठविल्या जाणाऱ्या नवीन परकीय चलनातून विदेशातील भारतीयांना अधिक रुपये मिळत असले तरी दुसऱया बाजूला भारतीय रुपयांमधील मालमत्तेचे (असेट्सचे) परकीय चलनाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मूल्य घसरताना दिसत आहे.
डॉलर्स, पाऊंड्स किंवा दिरहॅममध्ये कमाई करणाऱया अनिवासी भारतीयांच्या प्रत्येक रुपयाच्या गुंतवणुकीत चलन घसरणीचा म्हणजेच चलन जोखमीचा एक छुपा धोका दडलेला आहे. ही एक चलनविषयक जोखीम (करन्सी एक्सपोजर) आहे आणि ती कदाचित गुंतवणूकदाराने कधीही जाणीवपूर्वक स्वीकारलेली नसते, परंतु केवळ या कारणामुळे भारत हा विदेशी गुंतवणुकीसाठी अनाकर्षक ठरत नाही, पण प्रत्येक नवीन रुपयातील गुंतवणुकीला मिळणारा परतावा हा त्या जोखीम पातळीच्या निकषावर (हर्डल रेटवर) खरा उतरणे आवश्यक असतो.
विशेषतः आखाती देशांमध्ये राहणारे अनेक अनिवासी भारतीय लोक रुपयाची घसरण हे भारतात अधिक पैसे पाठवण्याचे कारण मानतात, पण त्यांच्या मनात पहिला प्रश्न हा आला पाहिजे की, भारतात आपली आधीपासूनच किती गुंतवणूक आहे? एका अनिवासी भारतीय व्यक्तीची भारतातील गुंतवणूक ही केवळ म्युच्युअल फंड आणि बँक ठेवींपुरती मर्यादित नसते. यामध्ये स्थावर मालमत्ता (प्रॉपर्टी), कौटुंबिक व्यवसाय, विमा, पेन्शनची मालमत्ता आणि वारसा हक्काने मिळालेली संपत्ती यांचाही समावेश असू शकतो. अनिवासी भारतीय व्यक्तीची भारतातील गुंतवणूक अपुरी आहे का? हा मूळ प्रश्न नसून त्याला यापुढे मिळणारा डॉलर, पाऊंड किंवा दिरहॅमचे रूपांतरदेखील रुपयाच्या स्वरूपातील गुंतवणुकीतच करायला हवे का? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय बाजारपेठेत 12 टक्के परतावा देणारी गुंतवणूक डॉलरमध्ये कमाई करणाऱ्या गुंतवणूकदाराला आपोआप 12 टक्के परतावा देईलच, असे नाही. वर्षभरात रुपयाचे मूल्य चार टक्क्यांनी घसरले तर डॉलर्सच्या स्वरूपात मिळणारा निव्वळ परतावा (नेट रिटर्न) सुमारे आठ टक्केच राहतो. त्यामुळे अनिवासी भारतीय मंडळींनी भारतीय गुंतवणुकीची तुलना करताना चलनाच्या मूल्याची घसरण, रोखता (लिक्विडिटी), केंद्रीकरण (काॅन्सन्ट्रेशन), कर आकारणी आणि कागदपत्रांची किंवा प्रशासकीय गुंतागुंत या सर्व गोष्टींचा विचार करून जागतिक पर्यायांसोबत तुलना केली पाहिजे. त्यांचा निकष फक्त भारतीय बाजारपेठ नसून जागतिक स्तरावर उपलब्ध असणारे गुंतवणुकीचे इतर पर्याय हासुद्धा असला पाहिजे.
अनिवासी भारतीयाला गुंतवणुकीवर मिळणारा अपेक्षित परतावा जितका महत्त्वाचा आहे, तितकाच ती व्यक्ती भविष्यात ते पैसे नेमके कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या चलनात खर्च करणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
भारतात निवृत्त जीवन जगण्याची योजना आखणाऱ्या व्यक्तीचे खर्च प्रामुख्याने रुपयामध्ये असणार आहेत. त्यामुळे त्यांना रुपयावर आधारित अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असणे अगदी साहजिक आहे. याउलट परदेशात निवृत्त जीवन जगण्याचा विचार करत असलेली अनिवासी भारतीय व्यक्ती ज्या देशात आपला वृद्धापकाळ व्यतीत करण्याचा विचार करत आहेत, त्या देशाच्या चलनाशी त्यांना आपली गुंतवणूक जुळवावी लागेल. आता हे चित्र तुमच्या समोर स्पष्ट झालेले आहे. अशा स्थितीत तुम्ही भारतात निवृत्ती घेण्याचा विचार करत असाल, परंतु त्याच वेळी वारंवार परदेश दौरे करत असाल तर तुमच्या गुंतवणुकीमुळे तुमच्यासाठी कोणतीही छुपी चलनविषयक जोखीम (इम्प्लिसिट करन्सी रिस्क) तयार होत तर नाही ना, याची खात्री गुंतवणुकीच्या वेळी करून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
मुख्य प्रश्न अगदी सोपा आहे. जेव्हा मला या पैशांची गरज भासेल, तेव्हा मी हे पैसे नेमके पुठे (कोणत्या देशात) खर्च करणार आहे?
जर एखाद्या अनिवासी भारतीयाने आधीच भारतात स्थावर मालमत्ता, व्यवसाय आणि आर्थिक मालमत्तेमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे, तर केवळ आणखी पारंपरिक पद्धतीने शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा मुदत ठेवीत पैसे गुंतवत वैविध्यकरणाचा हेतू साध्य करण्याच्या नादात एकाच ठिकाणी त्याची गुंतवणूक केंद्रित होऊ शकते. हा मुद्दा कळत असला तरी काही अनिवासी भारतीय जाणीवपूर्वक भारतात मोठी गुंतवणुकीवर भर देऊ शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, भारतात माघारी येण्याची योजना, व्यावसायिक हितसंबंध किंवा भविष्यात भारताच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीबाबत असलेला विश्वास या सर्व मुद्दय़ांच्या आधारे ते भारतातील गुंतवणुकीचे समर्थन करू शकतात, परंतु त्यांनी गुंतवणुकीचा हा निर्णय आंधळेपणाने न घेता विचारपूर्वक केलेला असावा.
भारतात अतिरिक्त गुंतवणूक करणे आवश्यक वाटत असेल तर गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. त्यामध्ये हार्ड करन्सी/यूएस डॉलरमधील प्रायव्हेट इक्विटी (पीई), व्हेंचर पॅपिटल (व्हीसी) आणि प्रायव्हेट व्रेडिट योजना या गुंतवणूक पर्यायांचा समावेश आहे. या साऱया पर्यायातून वैविध्यता तसेच फायदेशीर पर्यायही उपलब्ध होऊ शकतात. अर्थात या पर्यायात काही धोके आणि अडचणीसुद्धा येऊ शकतात. त्यात प्रामुख्याने फंड चालवणाऱया व्यक्तीबाबत किंवा पंपनीबाबत असणारा धोका (मॅनेजर रिस्क), पैशांची तातडीने देवाणघेवाण न होणे किंवा सहजासहजी रोखीत रूपांतर न करता येणे (इलिक्विडिटी) आणि पैसे गुंतवून ठेवण्याचा दीर्घ कालावधी (लाँग इन्व्हेस्टमेंट हॉरायझन्स) असे धोके उद्भवू शकतात.
सध्या जगभरातील लाखो अनिवासी भारतीय व्यक्ती आपला बहुतांश पैसा भारतात गुंतवतात. याउलट भारतामधून परदेशात गुंतवणूक करण्यावर फारसा भर दिला जात नाही. भारतातूनच नियंत्रित असलेल्या यंत्रणेद्वारे अनिवासी भारतीयांना जागतिक पातळीवर गुंतवणूक करणे शक्य होण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत, परंतु गिफ्ट सिटीमध्ये नोंदणीपृत असलेले आणि डॉलरच्या स्वरूपात असणारे जागतिक फंड ही त्रुटी दूर करण्यास मदत करू शकतात.
(लेखक अर्थ भारत इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स आयएफएससी एलएलपीचे मॅनेजिंग पार्टनर आहेत)




























































