पालघरमधील डॉक्टरवर हल्ला – शिंदे गटाच्या सहा आरोपींचा जामीन फेटाळला; २३ जणांचा कोठडीतच मुक्काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २३ आरोपींपैकी शिंदे गटाच्या सहा आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सुजाता बांदल यांनी सहाही आरोपींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व २३ आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालघर न्यायालयात पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राड्याप्रकरणी सहा आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कथित भूमिकेसह तपासाची सद्यस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून सहाही जणांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन नाकारण्यात आलेल्यांमध्ये आमदार पुत्र रोहित राजेंद्र गावीत, राहुल संखे, मनीष उर्फ विकी संखे, ऋषभ वारे, साईराज पाटील आणि नीलम संखे यांचा समावेश आहे. रोहित गावीत आणि ऋषभ वारे यांनी १८ सप्टेंबरला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मनीष संखे, साईराज पाटील आणि राहुल संखे यांनी १९ सप्टेंबरला तर नीलम संखे यांनी २१ सप्टेंबरला अर्ज केला. या अर्जावर २३ आणि २४ सप्टेंबरला दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला होता.

सरकारी पक्षाचा जामिनाला कडाडून विरोध
तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक निशा जाधव यांनी आरोपींना जामीन देण्यास विरोध केला. तपास अद्याप सुरू असून आरोपींची कथित भूमिका, उपलब्ध पुरावे आणि तपासाची सद्यस्थिती लक्षात घेता जामीन मंजूर करू नये, अशी भूमिका सरकारी पक्षाने मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निकाल अपेक्षित होता. मात्र रुग्णालयाच्या वतीने रमेश म्हात्रे यांच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भन्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर निर्णय मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.