अँटिलिया प्रकरणी सचिन वाझेला जामीन, पुरावे सादर करण्यात एनआयएला अपयश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीनच्या स्पह्टक कांडय़ा व व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. या पृत्यामुळे अंबानी पुटुंबीय दहशतीखाली होते याचा कोणताही ठोस पुरावा एनआयएला सादर करता आला नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.

विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी वाझे याला जामीन मंजूर करताना या प्रकरणी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) दहशतवादाचे आरोप लागू करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. इतकेच नव्हे तर, प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करताना एनआयएला अपयश आल्याचे नमूद करत या कटातील लक्ष्यांचे जबाब नोंदवण्यासाठी तपास यंत्रणा कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत होती, असा सवाल न्यायालयाने केला. यूएपीएच्या कलम 15 अंतर्गत दहशतवादी पृत्य ठरविण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने वाझेची सुटका करण्याचे आदेश दिले.

एनआयएकडून हायकोर्टात आव्हान

एनआयएने हायकोर्टात अपील दाखल करत विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल व न्यायमूर्ती रणजितसिंग भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची विनंती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्या वतीने करण्यात आली, मात्र न्यायमूर्ती कोतवाल यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे या याचिकेवर उद्या बुधवारी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.