
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जेएमएआर) प्रकल्पामुळे फिल्मसिटीमधील चित्रीकरण स्थळांना मोठा फटका बसला आहे. परिणामी फिल्मसिटी महामंडळाच्या महसुलावर परिणाम झाला असून या नुकसानीपोटी महामंडळाने मुंबई महापालिकेकडे तब्बल 174 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. मात्र महापालिकेने प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि वापराचा कालावधी विचारात घेऊन 20 कोटी 8 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
जेएमएलआरच्या टप्पा 3 (बी) अंतर्गत, गोरेगावमधील ‘फिल्मसिटी’ला मुलंड पश्चिममधील ‘अमर नगर’शी जोडणारे 5.30 किमी लांबीचे जुळे बोगदे (ट्विन टनेल्स) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बांधले जात आहेत. या प्रकल्पासाठी 45.70 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्याकरिता ‘फिल्मसिटी’मधून जाणारा 1,600 मीटर लांबीचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
यासाठी पालिकेने फिल्मसिटीजवळील जोश मैदान आणि जोकर मैदान यांसारख्या जागा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. या मैदानांचा वापर ‘टनेल बोरिंग मशीन’चे (टीबीएम) सुटे भाग ठेवण्यासाठी आणि उत्खननातून निघालेला राडारोडा साठवण्यासाठी केला जात आहे. याव्यतिरिक्त कामाचे क्षेत्र म्हणून वापरण्यासाठी 1,600 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद अशी जमिनीची अतिरिक्त पट्टीही ताब्यात घेण्यात आली आहे.
भरपाईबाबतचा वाद
महामंडळाचे म्हणणे आहे की, या ठिकाणांवरील चित्रीकरण थांबवल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांनी 174.12 कोटी रुपयांची भरपाई आणि भाडय़ाची मागणी केली आहे.
ही जमीन पालिकेकडे किती कालावधीसाठी राहील हे निश्चित नसल्यामुळे 31 मार्च 2029 पर्यंतच्या कालावधीवर आधारित 20 कोटी 8 लाख 30,677 रुपयांची तात्पुरती रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
























































