
एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या सवलतींसाठी बंधनकारक केलेल्या एनसीएमसी कार्डाबाबत नवीन वाद समोर आला आहे. कार्डच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी महामंडळाने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर मराठी भाषेलाच डावलण्यात आले असून संवादासाठी केवळ हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मराठी भाषा सक्तीसाठी आग्रही राहिलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील एसटी महामंडळानेच मायमराठी डावलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. हे कार्ड वापरताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी 022-42022190, 022-69787303 हे दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. यावरून ‘कार्ड ऑक्टिव्हेशन’, रक्कम टॉपअप, उपलब्ध शिल्लक तपासणी आणि इतर तांत्रिक समस्या सोडवण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मात्र या हेल्पलाईनवर संपर्प साधणाया प्रवाशांना केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेचाच पर्याय देण्यात आला आहे. एनएसडीएल पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून हेल्पलाइन सुरु करताना एसटी महामंडळाला मराठी भाषेचा पर्याय प्राधान्याने देण्याचा विसर पडला आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीमध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने होणे आवश्यक असताना मराठीला डावलल्याने प्रवासी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. एकीकडे परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यावसायिक वाहनांच्या चालकांना मराठी भाषा सक्तीची केली आहे. परिवहन मंत्री नात्याने ते एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. मराठीप्रेम दाखवताना त्यांना एसटी महामंडळाकडून मराठीला डावलले गेल्याचे निदर्शनास कसे आले नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण
एसटीने प्रवास करणारे बहुतांश ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागातील आहेत. त्यांना हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्प साधल्यानंतर हिंदी किंवा इंग्रजी भाषांमध्ये तांत्रिक अडचणी स्पष्ट करणे कठीण जात आहे. याबाबत अनेक प्रवासी हेल्पलाईनवर संपर्प साधून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. मराठीचा पर्याय नसल्यामुळे एसटीची हेल्पलाईन ही ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी सोईची ठरण्याऐवजी गोंधळाचे वातावरण निर्माण करीत आहे.



























































