
दिवसेंदिवस ठाणे शहरातील कचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे. ही कटकट कायमची सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ३ हजार ३३० कोटी रुपयांचा एक मेगा प्लॅन तयार केला आहे. दहा वर्षांसाठी प्रस्तावित असलेल्या या यंत्रणेत रस्त्याची सफाई करतानाच घराघरातूनही कचरा संकलन केला जाणार आहे.
याबरोबरच कचऱ्याची वाहतूक, झोपडपट्टी भागातील स्वच्छता अशा विविध गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी तीन पॅकेज तयार केले असून स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना आता तरी कचरा समस्या कायमची सुटणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सध्या दररोज सुमारे १ हजार ६०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. गेल्या काही वर्षांत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कचरा व्यवस्थापनावरचा ताणही वाढला आहे. भविष्यातील लोकसंख्या आणि कचरा निर्मितीचा विचार करून पालिकेने एकात्मिक स्वच्छता यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता तीन स्वतंत्र पॅकेजमध्ये विभागण्यात आली आहे. दिवा, मुंब्रा आणि कळवा यांचा पहिल्या पॅकेजमध्ये, माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर आणि लोकमान्य-सावरकरनगर यांचा दुसऱ्या पॅकेजमध्ये तर उथळसर, नौपाडा-कोपरी आणि वागळे यांचा तिसऱ्या पॅकेजमध्ये समावेश आहे. प्रत्येक पॅकेजसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
आधुनिक वाहनांतून वाहतूक
प्रकल्पासाठी पहिल्या वर्षाचा अंदाजित खर्च सुमारे २५० कोटी रुपये तर दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आधुनिक वाहनांच्या माध्यमातून कचऱ्याची वाहतूक केली जाणार आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण आणि शास्त्रोक्त वाहतुकीवरही भर देण्यात येणार आहे.
कमांड सेंटरमधून नजर
शहराच्या स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक कमांड सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सफाईची कामे, वाहनांची हालचाल आणि सेवांची अंमलबजावणी यावर लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांना स्वच्छतेशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी २४ तास सेवा उपलब्ध करून देण्याचीही तरतूद आहे.




























































