पोलीस डायरी – तोतयांच्या वर्दीला मूर्खाचा सलाम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार, [email protected]

बनावट कागदपत्रं व ओळखपत्रांचा वापर करून फसवणूक करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अमली पदार्थ, मानवी तस्करी, अपहरण, खंडणी, चोरी, घरफोडी, खून, मारामारी, सायबर आदी विविध गुन्हयांत २०२४ साली मुंबईसह देशभरात ४ लाख महिलांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते, तर १ लाख ५० हजार महिलांना अटक करण्यात आली होती महिलांवरील कारवाईचा हा वाढता आकडा तसेच महिलांच्या गुन्हेगारीचा बदलता चेहरा चिंतनीय आहे. कोणत्याही संघटित गुन्हयात अलीकडे एका तरी महिलेचा सहभाग असतो. संघटित टोळीत सामील झालेल्या एका तरुणीला मुंबई क्राईम बॅचच्या अधिकाऱ्यांनी ठाणे येथे चकमकीत ठार मारले होते.

पोलीस, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पुरुष टोळ्या गेल्या अनेक वर्षांपासून जनतेला फसवत आहेत. त्यात आता पुरुषांप्रमाणे महिलाही मागे नाहीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिलांनी आता आयएएस, आयपीएस असल्याचे भासवून लोकांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यास सुरुवात केली आहे याच महिन्यात वाराणसीच्या तृप्ती सिंग राजपूत या तरुणीला मध्य प्रदेश पोलिसांनी आयएएस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक केली. ही तरुणी शालांत परीक्षाही उत्तीर्ण झालेली नाही. तरीही स्वतःच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास असलेल्या या तरुणीने आपल्या भावाला सोबत घेऊन तोतयेगिरी सुरू केली.

स्वतः जिल्हाधिकारी, आयएएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र तयार केले भावालाही नकली पत्रकार बनविले. इनोव्हा गाडी भाड्याने घेऊन तिने ड्रायव्हरही नेमला. गाडीवर भारत सरकारची नेमप्लेट लावली. तारांकित हटिलात उठणे, बसणे सुरू केले. आयएएस अधिकारी असल्याने आपण कुणालाही नोकरी मिळवून देऊ शकतो असा प्रचार तिने सुरू केला. त्यात काही बेकार तरुण फसले. लाखो रुपये देऊनही नोकरी न मिळाल्याने काही तरुणांनी तृप्ती सिंगविरुद्ध पोलिसांत तक्रार केली तेव्हा या तरुणीचे बिंग फुटले. तृप्ती सिंग हिच्या मैत्रिणीने तृप्ती आयएएस असल्याचा व्हायरल केलेला व्हिडीओही तृप्तीच्या मुळावर आला आणि ती पकडली गेली. भोपाळ पोलिसांनी तृप्ती सिंग, तिचा भाऊ व अन्य दोघेजण अशा चार जणांना अलीकडे अटक केली.

पुण्याची मिनाज मुर्तुजा शेख ही महिला तर आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सराफांकडून लाखो रुपयांचे दागिने खरेदी करायची व पैसे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन घेऊन जा,’ असे फर्मान द्यायची. व्यापारी विश्वास ठेवायचे. परंतु पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचल्यावर त्यांच्या हाती धतुरा पडायचा पुणे पोलिसांनी मिनाज शेखला अटक केली.

हरयाणातील जोया खान ही आयपीएस व आयएएस असल्याचे भासवून स्थानिक पोलिसांकडून एस्कॉर्ट (संरक्षण) मागवायची आणि लाल दिव्याच्या गाडीतून फिरायची. अनेकांना फसविल्याचे उघड झाल्यावर तिलाही हरयाणा पोलिसांनी अटक केली.
कल्पना त्रिंबकराव भागवत या महिलेने तर आयएएस अधिकारी असल्याचे भासवून संभाजीनगर येथील तारांकित हॉटेलात तब्बल ६ महिने पैसे न देता वास्तव्य केले होते. रूमबाहेर न येणाऱ्या या महिलेचा हॉटेल व्यवस्थापकांना संशय आल्यानंतर सिडको पोलिसांना बोलावून घघेण्यात आले. तेव्हा कल्पना भागवत बनावट आयएएस अधिकारी असल्याचे उघड झाले. तिच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे खोटी निघाली. तिचे अफगाणिस्तानातील तरुणाशी संबंध असल्याचेही तपासात उघड झाले. या महिलेने मराठी असल्याचा फायदा घेऊन मराठी आमदार, खासदार यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते.

आयएएस/आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून बिहारच्या मनीष कुमार गुप्ता ऊर्फ चिक्कू या दहावीच्या टॉपर तरुणाने तर सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता जमविली आहे. मनीष कुमार हा गेली ७ वर्षे आयएएस अधिकारी असल्याचे सांगत होता. त्यानंतर तो पकडला गेला.

गुजरातचा अल्बर्ट ख्रिश्चन, उत्तर प्रदेशचा सौरभ त्रिपाठी, मध्य प्रदेशचा हिमांशु पांचाळ ऊर्फ राजसोनी, लखनऊचा डॉ. विवेक मिश्रा, बिहारचा विकास कुमार, पुण्याचा सागर वाघमोडे, उल्हासनगरचा राजू पट्टेकर, मुंबईचा संदीप गोसावी, नाशिकचा गौरव मिश्रा, हैदराबादचा शशिकांत… असे बरेच तोतये आयएएस /आयपीएस अधिकारी पकडले गेले आहेत. काही तोतये तर रिक्षा व फेरीवाल्यांकडूनही खंडणी उकळायचे बिहारच्या डॉ विवेक मिश्रा याने तर लोकांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे.

विशेष म्हणजे आयएएस/आयपीएस असल्याचे भासवून बरेच स्त्री-पुरुष तोतये स्थानिक पोलिसांचे संरक्षण (एस्कॉर्ट) घेऊन लाल दिव्याच्या गाडीतून फिरतात व खंडणी वसुली करतात. तोतयांना ‘एस्कॉर्ट देणाऱ्या पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळेच मुंबईत ‘२६/११’ची भयंकर घटना घडली.

वर्तमानपत्र उघडले की, दर महिन्याला एक तरी बातमी हमखास असते ती बोगस आयएएस /आयपीएस, सीबीआय, पोलीस अधिकारी लाच घेताना पकडल्याची. गाडीवर भारत सरकारचा बोर्ड दिसला की, लोकांची विचारशक्तीच थंड होते. कुणी त्यांचे ओळखपत्र तपासत नाही किंवा त्याची खातरजमा करीत नाही. रुबाब बघून, त्यांचे फाडफाड इंग्लिश ऐकून लोक फसतात. तोतयांना शरण जातात, त्यांच्या वर्दीला सलाम करतात. याला मूर्खपणा म्हणायचे नाही तर काय? कल्पना भागवत हिने ‘पद्मश्री’ मिळवून देते. असे सांगून आमदार-खासदारांकडून लाखो रुपये उकळले होते. मग याला जबाबदार कोण? आपल्या देशात मूर्खाची कमी नाही हेच यावरून दिसून येते.