
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांबाबत दावा केला आहे. अनेक आमदार समाजवादी पक्षाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, या आमदारांना पक्षात कसे सामावून घ्यायचे, हा प्रश्न असल्याचेही यादव म्हणाले.
भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याबाबत विचारले असता अखिलेश यादव म्हणाले की, त्यांचे बृजभूषण यांच्याशी संबंध चांगले आहेत. उत्तर प्रदेशच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्वजण एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी बृजभूषण यांच्यासमोर ‘हिरवा की लाल गमछा’ निवडण्याचा संदर्भ देत राजकीय टिप्पणी केली.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत विचारले असता, पूर्वीचेच गठबंधन कायम राहील, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उभा करण्याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर न देता, सर्व गणिते पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराची माहिती दिली जाईल, असे म्हटले आहे. यादव यांनी मागील राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ देत निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोपही केला असून, भाजप कडून गैरप्रकार झाला नसता तर समाजवादी पक्षाचे तीन खासदार झाले असते, असे म्हटले आहे. दरम्यान, किसान संमेलनात अखिलेश यादव यांनी शेतकऱ्यांसाठी स्वस्त वीज, मोफत सिंचन आणि ऊस उत्पादकांना 24 ते 48 तासांत पैसे देण्याचे आश्वासन दिले.
























































