ज्ञानेश कुमारांविरोधात पहिली याचिका दाखल, निवडणूक आयोगाला नोटीस; महाभियोग खटला चालवा – ऍड. असीम सरोदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाहीत सुरू असलेला प्रकार अंत्यत वाईट असून, निवडणुका चोरण्याचे चित्र सातत्याने बदलत गेले आहे. घोटाळ्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशातील पहिली याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली असून, 22 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाला आम्ही नोटीस पाठवली आहे. जुनी मतदारयादी हा महत्त्वाचा विषय असून, एसआयआर प्रक्रियाच आक्षेपार्ह आहे. त्यामुळे जुन्या मतदारयादीचा वापर झाला पाहिजे. यांसह मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात महाभियोग खटला चालला पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘एसआयआर’संदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात ऍड. सरोदे यांनी निवडणूक आयोग आणि भाजप सरकारच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले. दरम्यान, ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयोगाच्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘एसआयआर’ जर चुकीच्या पद्धतीने झाले असेल, तर जुनी मतदारयादी पुन्हा प्रस्थापित करावी. पुढील निवडणुका जुन्या मतदारयादीवर आधारित घेतल्या पाहिजेत. निवडणूक आयोगाने काय प्रकिया केली ते जाहीर करावी, अशी मागणी करत ऍड. सरोदे म्हणाले, 2023च्या कायद्याने निवडणूक आयोगाला अवास्तव संरक्षण दिल्याने, लोकशाहीतील चेक्स ऍण्ड बॅलन्सची व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. निवडणूक आयोगाची चिकित्सा करण्याचे अधिकार काढून घेणे चुकीचे असून, यातील बदल रद्द केले पाहिजेत. आता ज्ञानेश कुमार व त्यांच्या सहकाऱयांनी एकत्रित पत्र काढले असले तरी त्यांनी बहुमताने घेतलेल्या निर्णयाचे पुरावे न्यायालयात सादर करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच संविधान मानणारे राज्यकर्ते हवेत, असे स्पष्ट करत इतरांचे मत दाबून अराजकीय परिस्थिती निर्माण करणाऱयांनी घरी बसले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

‘एसआयआर’मधून अनेकांना वगळून लोकशाहीतून बेदखल केलेल्यांचे अधिकार संरक्षित करण्याची भूमिका सरकारची असली पाहिजे. ‘एसआयआर’ बाबत निःपक्ष चौकशी झाली पाहिजे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयात रिट पिटीशन लावून धरणार असून, या प्रकरणाची 22 ऑक्टोबरला कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी आहे. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाला नोटीस पाठविल्याचेही ऍड. असीम सरोदे यांनी सांगितले.

पक्षावर नव्हे, देशावर प्रेम करणारे निवडणूक आयुक्त पाहिजेत

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधानाचा अपमान केला आहे. त्यामुळे निवडणूक आयुक्तांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत; पक्षावर नव्हे, तर देशावर प्रेम करणारे निवडणूक आयुक्त पाहिजेत, असे ऍड. असीम सरोदे यांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करा, अशी मागणी करणारेच खरे भाजप आणि संघाचे कार्यकर्ते असू शकतात. बाकी सर्व नकली असल्याची टीकाही त्यांनी केली.

…तर मुख्यमंत्र्यांचा मेंदू तपासण्याची गरज आहे, असे म्हणायचे का?

देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा मेंदू तपासण्याची केलेली भाषा अयोग्य आहे. लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असे याआधी तेरावेळा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. याला आम्ही केवळ खोटे बोलणे असे म्हणतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांचा मेंदू तपासण्याची गरज आहे असे म्हणायचे का, असा उपरोधिक टोला ऍड. असीम सरोदे यांनी लगावला.