
सांगलीवाडी येथे चोरी करताना 10 लाखांची रोकड असलेले एटीएम मशीनच पळवणाऱया परप्रांतीय टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली. या टोळीने चार राज्यांत 11 ठिकाणी अशाप्रकारचे गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आहे.
बहादूर प्रल्हादराम चौकीदार बावरी (वय 36, रा. कुलियाना, जि. डिडवाना), गोपाल तेजाराम बावरी (वय 34, रा. रावलियावास, जि. नागौर, राजस्थान) या दोघांना अटक केली. तर अर्जुन प्रेमाराम मेघवाल हा पसारी आहे.
सांगलीवाडीमधील डॉ. कदम महाविद्यालयासमोरील एचडीएफसी बँकेचे एटीएम 10 लाख 34 हजार रुपयांच्या रोकडसह चोरीला गेल्याचा प्रकार 16 सप्टेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
पोलीस पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे चोरटय़ांची नावे निष्पन्न केली. त्यानुसार टोळीतील बहादूर व गोपाल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील जीपमध्ये चोरीची दुचाकी मिळाली. तसेच जीपमध्ये गॅस टाकी, गॅस कटर, पट्टा, लोखंडी टॉमी मिळाली. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पसार असलेला साथीदार अर्जुन मेघवाल याच्या मदतीने सांगलीवाडीतील एटीएम मशीन चारचाकी वाहनास बांधून ओढून तोडून गाडीत टाकून नेल्याचे सांगितले. सांगलीवाडीतील एटीएम मशीन लक्ष्मी फाटा ते कसबे डिग्रज रस्त्यावरील उसाच्या शेतात टाकल्याचे कबूल केले. पोलिसांनी ते जप्त केले. सांगलीवाडीतील एटीएम मशीनमधील रोकड घेऊन अर्जुन मेघवाल पसार झाल्याचे सांगितले. टोळीकडून सांगली शहर, नाशिक, सोलापूर, नांदेड, सातारा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतील 11 गुन्हे उघडकीस आणले. अटक केलेल्या दोघांकडून जीप, दोन दुचाकी, रोख 15 हजार रुपये, गॅस कटर, दोरखंड, दोन मोबाईल असा 10 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी सुभाष सूर्यवंशी, अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, दरीबा बंडगर, संदीप नलावडे आदींनी सहभाग घेतला.
मुक्कामी राहून केली ‘रेकी’
ज्या परिसरात चोरी करायची आहे, तेथून 50 किलोमीटरच्या अंतरात ग्रामीण भागात खोली घेऊन संशयित राहत होते. रेकी करण्यासाठी आसपासच्या भागातील दुचाकी चोरत होते. कमी वस्तीच्या ठिकाणी तसेच जमिनीपासून 3-4 फूट उंच असलेले एटीएम मशीन शोधत होते. त्यानंतर रात्री एटीएम मशीनला दोरखंड बांधून जीपने ते ओढून तोडत होते.
एटीएम मशीन चोरीचेच गुन्हे
अटक केलेल्या आंतरराज्य टोळीविरुद्ध महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली येथे गुन्हे दाखल आहेत. बहादूर बावरी याच्याविरुद्ध 30 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तर गोपाल बावरी याच्यावर 40 पेक्षा जास्त एटीएम चोरीचे व इतर गुन्हे दाखल आहेत.




























































