Asian Games : तिरंदाजीत हिंदुस्थानला आणखी एक सुवर्णपदक, चिकीथा तानीपार्थी आणि साहिल जाधव जोडीची ऐतिहासिक कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये हिंदुस्थानच्या तिरंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी सुरूच ठेवली आहे. बुधवारी झालेल्या कंपाऊंड तिरंदाजीच्या मिश्र सांघिक (Mixed Team Compound) प्रकारात हिंदुस्थानच्या चिकीथा तानीपार्थी आणि साहिल जाधव या जोडीने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

अंतिम फेरीत हिंदुस्थान आणि दक्षिण कोरिया यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. चौथ्या फेरीअखेर (End 4) दोन्ही संघ 157-157 अशा बरोबरीत होते. त्यामुळे सामन्याचा निकाल लावण्यासाठी ‘शूट-ऑफ’चा आधार घेण्यात आला. शूट-ऑफमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी अचूक वेध घेत दक्षिण कोरियाला पराभूत केले आणि हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले.

चालू आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमधील हिंदुस्थानचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी महिलांच्या कंपाऊंड सांघिक संघानेही सुवर्णपदकावर नाव कोरले होते. विशेष म्हणजे, त्या विजेत्या महिला संघातही चिकीथा तानीपार्थीचा समावेश होता. त्यामुळे एकाच दिवसात दोन सुवर्णपदके जिंकून चिकीथाने चमकदार कामगिरी नोंदवली आहे.

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची पदकांची लयलूट सुरूच आहे. बुधवारी हिंदुस्थानच्या महिला तीरंदाज संघाने कंपाऊंड प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या महिला संघाने चीनचा 238-234 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह हिंदुस्थानच्या महिला संघाने जागतिक विक्रमाचीही बरोबरी करण्याचा पराक्रम केला आहे.