Jammu Kashmir News – पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉण्टेड दहशतवादी हाशिम मूसा चकमकीत ठार, 20 लाखांचे होते बक्षीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा याचा खात्मा करण्यात यश आले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख संशयितांपैकी एक असणाऱ्या हाशिम मूसा याचा तपास यंत्रणांकडून शोध सुरू होता.

बडगाममधील पालमेदन परिसरात झालेल्या चकमकीत मूसा ठार झाले असून त्याचा मृतदेहही सापडला आहे. सुरक्षा दलांनी त्याच्या मृतदेहाजवळून हत्यारं आणि संशयित साहित्यही जप्त केले आहे. हिंदुस्थानी लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या कारवाईची माहिती दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

गुप्तचर विभागाने माहितीनंतर बडगाम जिल्ह्यातील युसबर्ग भागात लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्त शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाल आढळून आली. सुरक्षा दलाने शरण येण्याचे आवाहन केल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. यावेळी उडालेल्या चकमकीत हाशिम मूसा ठार झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला असून हत्यारांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. या भागात आणखी दहशतवादी लपलेले आहेत का यासाठी शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

20 लाखांचे होते बक्षीस

22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरन परिसरात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीर पोलिसांनी हाशिम मूसा, अली भाई आणि आदिल हुसेन ठोकर या संशयितांचा फोटो प्रसिद्ध केला होता. त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी २20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

पाकिस्तानी नागरीक, एनआयएच्या आरोपपत्रातही उल्लेख

सुरक्षा यंत्रणांच्या तपासानुसार हाशिम मूसा हा पाकिस्तानचा नागरिक असून तो लश्कर-ए-तोयबाशी संबंधित होता. तपासादरम्यान तो पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये पॅरा-कमांडो म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली होती. 2025 मधील पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी जम्मू-कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या होत्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एनआयएने पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबा आणि त्याची छुपी संघटना म्हणून नमूद केलेल्या द रेसिस्टन्स फ्रंटचा उल्लेख केला आहे. एनआयएने दाखल केलेल्या 1597 पानी आरोपपत्रात हल्ल्याच्या कटाचा तपशील मांडण्यात आला असून या प्रकरणात पाकिस्तानस्थित दहशतवादी साजिद जट याचाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.