सामना अग्रलेख – शिवाजी पार्कचा ‘बुंदी लाडू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार यादीतून 13 कोटी मतदारांची नावे वगळल्याचा खुलासा झाल्यावर देश हादरला आहे. या दरोडेखोरीविरुद्ध लोक आंदोलन करत आहेत, पण शिवाजी पार्क बेटावरील काही रहिवाशांना या राष्ट्रीय आंदोलनाचा त्रास होत आहे. शिवाजी पार्क हा राजकीय आखाडा किंवा राजकीय सर्कशीची जागा नसल्याचा ‘बुंदी लाडू’ त्यांनी फोडला आहे. या सगळय़ांना शिवाजी पार्क व परिसराचा ज्वलंत इतिहास माहीत नाही. शिवाजी पार्कने महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली. अभिजित दीपकेंना विरोध हा देशाच्या स्वातंत्र्याला, लोकशाहीला, संविधानाला विरोध आहे. हा विरोध करणारेच खरे ‘दिमागी नक्षल’ आहेत. शिवाजी पार्कात नामर्दपणाचे तृण वाढत असेल तर ते उपटावे लागेल! 

काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 2 ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगातील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलनासाठी घोषणा केली. हे आंदोलन लोकशाही वाचवण्यासाठी आहे. आंदोलनाची सुरुवात मुंबईतून करण्याचा त्यांचा मानस होता. एक तर त्यादिवशी महात्मा गांधींची जयंती आहे व गांधीजींनी मुंबईतूनच इंग्रजांना ‘चले जाव’चा इशारा देऊन आंदोलनाची ठिणगी टाकली होती. त्यामुळे झुरळ पार्टीच्या नेत्यांची भूमिका योग्यच होती. पण सगळय़ात आधी मुंबई पोलिसांनी दीपकेंच्या आंदोलनास परवानगी नाकारली व दीपके यांनी शिवाजी पार्क येथील रस्त्यावर संविधानप्रेमी जनतेला जमा होण्याचे आवाहन करण्यासाठी शिवतीर्थावर पत्रकारांना बोलावले तेव्हा शिवाजी पार्क परिसरातील काही लोकांनी खाली उतरून दीपके व त्यांच्या ‘लोकशाही वाचवा’ आंदोलनाला विरोध केला. या लोकांचे म्हणणे असे आहे की, अशा आंदोलनाचा आम्हाला त्रास होतो. शिवाजी पार्क हे काही राजकीय नाटय़गृह किंवा राजकीय आखाडा नाही. हा असा विरोध म्हणजे मोदी-शहांच्या हुकूमशाहीला उघड पाठिंबा आहे. इंग्रज काळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांच्या विरोधात काही भारतीय इंग्रजप्रेमी उघड भूमिका घेत होते. स्वातंत्र्यवीरांच्या चुगल्या इंग्रज अधिकाऱ्यांकडे करून इनामे व सरकारी नोकऱ्या मिळवत होते व त्यांचेच वंशज आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्ता उपभोगीत आहेत. शिवाजी पार्कमधील इमारतींमधून खाली उतरलेले हे मूठभर लोक त्याच वंशावळीतले असावेत. एक तर हे प्रखर अंधभक्त असावेत किंवा सध्या देशात ज्या

हुकूमशाहीचा अतिरेक

सुरू आहे त्याचे समर्थक असावेत. या संघाळलेल्या लोकांमुळेच राष्ट्र नामर्द बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. एक तरुण मुलगा अमेरिकेतून चांगल्या संधी सोडून भारतात येतो. शिक्षणातील भ्रष्टाचार, पेपरफुटी, त्यातला भ्रष्टाचार या विरोधात रणशिंग फुंकतो. त्याला पाठबळ द्यायचे की विरोध करायचा? दिल्लीतील जंतर मंतरवर याच दीपके यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात एल्गार पुकारला होता. त्यांच्या या आंदोलनाने मोदी सरकारला भूकंपाचे जोरदार धक्के दिले होते. लाखो लोक दिल्लीच्या रस्त्यावर उतरून संसदेच्या दारात पोहोचले होते. तेव्हा मोदी-शहांची धुंदी उतरली व त्यांना त्यावेळचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला. या झुरळांना कमी लेखणाऱ्यांचा पुरता पचका झाला. देशासाठी तुरुंगात जाणे, लाठय़ा खाणे, छातीवर गोळय़ा झेलणे यासाठी देशातील ‘जेन-झी’ची पिढी तयार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाची निष्पक्षता भाजपच्या खुंटीला टांगून ठेवली आहे. मतदार यादीतून 13 कोटी मतदारांची नावे वगळल्याचा खुलासा झाल्यावर देश हादरला आहे. या दरोडेखोरीविरुद्ध लोक आंदोलन करत आहेत, पण शिवाजी पार्क बेटावरील काही रहिवाशांना या राष्ट्रीय आंदोलनाचा त्रास होत आहे. शिवाजी पार्क हा राजकीय आखाडा किंवा राजकीय सर्कशीची जागा नसल्याचा ‘बुंदी लाडू’ त्यांनी फोडला आहे. या सगळय़ांना शिवाजी पार्क व परिसराचा ज्वलंत इतिहास माहीत नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या, संयुक्त महाराष्ट्राच्या, शिवसेना स्थापनेच्या तसेच जनता पक्षाच्या आणीबाणीविरुद्धच्या लढय़ाचा राजकीय आखाडा शिवाजी पार्क हाच होता. याच मैदानावरून

राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय


नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत. शिवाजी पार्कवर राजकीय आखाडे व सर्कशी भरल्या नसत्या तर आज शिवाजी पार्कचे मराठीपण टिकले नसते व शिवाजी पार्कचे ‘अदानी-लोढा’ पार्क झाले असते. शिवाजी पार्क म्हणजे मुंबईचा आत्मा आहे. येथेच शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच मरगळलेल्या मराठी मनाला साद घातली व जागे केले. आंदोलनातून लोकशाही जिवंत राहते, पण गेल्या दहा वर्षांत मोदी-शहांनी सर्व प्रकारच्या आंदोलनांवर बंदी आणली आहे. लोकशाही ही जनतेने जनतेसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. मतदानाचा अधिकार भ्रष्ट मार्गाने हिरावला जातो तेव्हा रस्त्यावर उतरणे हा गुन्हा ठरत नाही. महात्मा गांधीजींनी सत्याग्रह केला. बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांसाठी लढत राहिले. त्याचा साक्षीदार शिवाजी पार्क परिसर आहे. वीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांच्यासारखी झुंजार माणसे शिवाजी पार्कातच वावरली. त्यांनी तेथे लाखोंच्या सभा घेतल्या. संपूर्ण शिवाजी पार्क तेव्हा ओसंडून वाहत असे. हा इतिहास सध्याच्या ‘संघाळलेल्या’ रहिवाशांना पुसता येणार नाही. शिवाजी पार्कात ‘नीट’ पेपरफुटीविरुद्ध आंदोलन यशस्वी झाले. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उसळलेल्या विजयी लाटेचा देखावा शिवाजी पार्कने अनुभवला. शिवाजी पार्कने महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली. अभिजित दीपकेंना विरोध हा देशाच्या स्वातंत्र्याला, लोकशाहीला, संविधानाला विरोध आहे. हा विरोध करणारेच खरे ‘दिमागी नक्षल’ आहेत. शिवाजी पार्कात नामर्दपणाचे तृण वाढत असेल तर ते उपटावे लागेल!