आभाळमाया- दीर्घिकांची साखळी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैश्विक

[email protected]

जेम्स वेब अवकाश-दुर्बिण कार्यरत झाल्यापासून विश्वातील जी कोडी हबल दुर्बिणीलाही उलगडणं शक्य नव्हतं ती आता स्पष्ट होऊ लागली आहेत. या दुर्बिणीने विश्वनिर्मितीच्या अगदी आरंभीच्या काळातील, म्हणजे 13.7 अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली त्यावेळची विश्वस्थिती कशी होती हे ‘याचि डोळा’ दाखवायला सुरुवात केली आहे. ‘जेम्स वेब’चे अवकाशातील स्थान त्यासाठी महत्त्वाचे आहेच, परंतु त्यावरील शक्तिशाली कॅमेरे जे, विश्वाचा जन्म ‘कसा’ झाला इथपर्यंत शोध घ्यायचा प्रयत्न करत आहेत. त्यात विश्वाच्या पोकळीत कधी एकटा-दुकटा भरकटणारा तारा तर कधी ग्रह सापडतोय. आतापर्यंतच्या साचेबंद कल्पनांना धक्के बसतायत. आपण सध्या समजतो तेवढंच विश्वाचं ‘वय’ आहे की त्याहूनही अधिक असे प्रश्न उभे राहतात. आता ‘त्याहूनही’ म्हणजे किती अधिक ते कालांतराने उघड होईल.

‘जेम्स वेब’ने पाठविलेल्या अनेक प्रतिमा (इमेज) किंवा साध्या शब्दात, अवकाशाचे फोटो, इफ्रारेड कॅमेऱ्याने टिपलेले असल्याने, ‘हबल’च्या फोटोत ज्या गोष्टी धूसर (ब्लर) दिसत होत्या त्या अगदी सुस्पष्ट दिसायला लागून त्यातील अनेक बारकावे (फीचर्स) जाणून घ्यायला मदत होते. विज्ञानाची कमाल आणि उत्तरोत्तर चढती कमाल ही अशीच असते. फक्त त्यामागे विधायक हेतू हवा.

याच ‘जेम वेब’ने एक ‘दीर्घिकांची साखळी’ शोधली. ‘शोधली’ याचे दोन अर्थ होतात. इन्व्हेन्शन म्हणजे मानवनिर्मित नव्या गोष्टीचा शोध (उदा. विमान) आणि दुसरा ‘शोध’ म्हणजे ‘डिस्कव्हरी’ त्याचा अर्थ जे अस्तित्वात होतंच, परंतु त्याची जाण आपल्याला नव्हती ते समजणं. (उदा. अमेरिकेचा ‘शोध’) ‘जेम्स वेब’ किंवा ‘हबल’सारखे टेलिस्कोप विश्वातील आपल्याला अज्ञात असलेल्या गोष्टींचं ‘दर्शन’ घडवतात.

काही काळापूर्वी ज्या ‘दीर्घिका-साखळी’ची ‘डिस्कव्हरी’ झाली त्या एकमेकींना साखळीच्या कडय़ांप्रमाणे जुळलेल्या कमीत कमी 20 दीर्घिका ‘जेम्स वेब’ने नोंदल्या. कदाचित ही संख्या अधिकही असू शकेल, असं संशोधकांना वाटतं. मुख्य म्हणजे, या सर्व दीर्घिकांची निर्मिती सुमारे 13 अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. याचा अर्थ, विश्वाचं वय अवघं 70 कोटी वर्षांचं होतं किंवा 2 अब्ज वर्षांचे होते त्या काळातही दीर्घिकांची साखळी अस्तित्वात आली. त्यामुळे विश्वनिर्मितीच्या अगदी ‘जवळ’ जाण्याचा मार्ग सापडला. आणखी 70 कोटी वर्ष ‘मागे’ गेलं तर कदाचित विश्व निर्माण झाल्याचा क्षण दिसेल? गणिती हिशेबाने दिसायला हरकत नाही, पण खगोल भौतिकशास्त्र्ााच्या काही नियमांनुसार ते अशक्य आहे. या गोष्टीचा छडा का लागणार नाही आणि आपली म्हणजेच मानवनिर्मित उपकरणांची नजर कुठे ‘थबकेल’ ती ‘ओपेक’ (अपारदर्शी) मर्यादा कोणती हे स्वतंत्र लेखात नंतर पाहू. आता या 20 दीर्घिकांच्या साखळीविषयी.

‘कॉस्मिक व्हाइन’ असं या ‘साखळी’चं नाव. तिचा आकार किंवा लांबी 1 कोटी 30 लाख प्रकाशवर्षांचा विस्तार दाखवते तर रुंदी 6 लाख 50 हजार प्रकाशवर्ष एवढी भरते.

ही दीर्घिका साखळी असी मेजर अथवा सप्तर्षी आणि बूटेस म्हणजे भूतप यांच्यामध्ये आहे. विश्वनिर्मितीनंतर अवघ्या 2 ते 3 अब्ज वर्षांत यातील दीर्घिका निर्माण झाल्या असा अंदाज आहे. ‘कॉस्मिक व्हाइन’चं (द्राक्षवेल) वस्तुमान सूर्याच्या 260 अब्ज पट आहे.

अनेक अभ्यासकांच्या मते, अशी विशाल गुंतागुंतीची ‘कॉम्पॅक्ट’ दीर्घिका साखळी विश्वनिर्मितीच्या आरंभीच्या काळात सापडणं म्हणजे, विश्वाच्या निर्मितीमध्ये दीर्घिका किती वेगाने निर्माण झाल्या त्याचं द्योतक (उदाहरण) आहे. यामध्ये ज्यामधील ताऱयांची निर्मिती थांबली आहे अशाही सुप्त दीर्घिका आहेत.

ही कॉस्मिक व्हाइन किंवा ‘वैश्विक द्राक्षवेल’ आपल्याला साध्या डोळय़ांनी दिसणं तर शक्यच नाही, परंतु पृथ्वीवरच्या शक्तिशाली दुर्बिणीतूनही दिसणं शक्य नाही. यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ‘कॉस्मिक डस्ट’ किंवा अवकाशीय ‘धुळी’चा पडदा भेदून इफ्रारेड टेलिस्कोपच ‘पाहू’ शकतो. ‘हबल’लासुद्धा जे शक्य झालेलं नाही ते नुसत्या डोळय़ांना काय दिसणार?

त्यासाठीच तर माणसाने शोधलेल्या आणि अवकाशात धाडलेल्या ‘हबल’, ‘चंद्रा’ किंवा ‘जेम्स वेब’सारख्या दुर्बिणी आहेत. त्यांच्या सहाय्याने गेल्या अर्धशतकात आपल्याला जेवढं विश्व कळलं आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत फोटोच्या स्वरूपात सादर करता आलं, असं पूर्वी कधीच घडलेलं नव्हतं. म्हणूनच ‘अवकाशी’ धांडोळा घेण्याचे विविध प्रयोग, त्यात एखादा छोटा अशनी, लघुग्रह, धूमकेतू, ग्रह, तारा किंवा प्रचंड दीर्घिका… आणि दीर्घिकांची अज्ञात मालिका (साखळी) आपल्याला दाखवू शकते.

‘कॉस्मिक व्हाइन’ या द्राक्षवेलीत दीर्घिकांची ‘द्राक्षं’ रसरसली आहेत. विज्ञान कोरडं नव्हे तर रसिकही असतं आणि अशा नामकरणातून ते सहज लक्षात येतं. या गोष्टीही लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.