
मंगळवारी रात्री उशिरा जम्मू -कश्मीरच्या बडगाम जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर हाशिम मुसा याचा मृत्यू झाला आहे. ही चकमक युसमार्ग भागातील ‘कोराग’ परिसरात झाली. या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तरीत्या शोधमोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात हाशिम मुसा ठार झाला.
गोळीबारात ठार झालेला मुसा हा सुलेमान शाह (ऊर्फ मुसा), फौजी मुसा आणि मोहम्मद आसिफ (ऊर्फ हाशिम मुसा) अशा नावांनी ओळखला जात होता. हाशिम मुसा हा दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे समजते. सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनुसार, तो पाकिस्तान लष्कराच्या ‘एसएसजी’ मधील माजी पॅरा कमांडो होता. त्याने 2022 मध्ये कश्मीर खोऱयात घुसखोरी केली होती. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत जम्मू-कश्मीरच्या उधमपूर आणि बडगाम जिह्यांमध्ये पाच दहशतवादी मारले गेले.


























































