आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी केले पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात येऊन कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्या पूर्णेकर यांचे पुत्र राम व बंधू जयनाथ पूर्णेकर यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रदीप पूर्णेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा लढा आपण लढत राहू, असा शब्द आदित्य ठाकरे यांनी यावेळी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांना दिला.

फडणवीसांनी वेश बदलून ठाण्यात फिरावे

मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचे नाव पुरवणी जबाबात दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे व संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पूर्णेकरांची हत्या करणारे सूत्रधार माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे दोघेही मिंधे गटाचे एकदम खासमखास आहेत. अशा लोकांना पोलीस आणि सरकार संरक्षण देणार आहे काय? राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस, तुम्ही राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारताय, पण दोन दिवस वेश बदलून ठाण्यात फिरा, मग ठाण्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती किती भयंकर आहे हे तुम्हाला कळेल, असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले. एका महिन्यात पाच खून झाले. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही बळी गेला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.