
हिंदुस्थानी नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा अचूक निशाणा साधत सुवर्णपदकावर नाव कोरले. नीरू धांडा आणि किनान चेनाई या हिंदुस्थानी जोडीने मिश्र ट्रॅप प्रकारात 34/40 गुणांची कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. याच कामगिरीसह हिंदुस्थानी जोडीने नवा आशियाई विक्रमही प्रस्थापित केला.
फायनलमध्ये सुरुवात काहीशी डळमळीत झाल्यानंतर नीरू–किनान जोडीने जबरदस्त पुनरागमन केले. नीरूने सुरुवातीच्या पाच निशाण्यांपैकी तीन संधी गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर दोन्ही नेमबाजांनी अचूकतेचा धडाका लावत आपली कामगिरी सातत्याने उंचावली आणि अखेर अव्वल स्थानावर झेप घेतली.
आशियाई विक्रमाची मोहोर
नीरू आणि किनान यांनी अंतिम फेरीत 40 पैकी तब्बल 34 लक्ष्ये भेदली. या कामगिरीने मिश्र ट्रॅपच्या अंतिम फेरीतील आशियाई विक्रम त्यांच्या नावावर झाला. याआधी हा विक्रम कतारच्या नावावर होता. कतारने जानेवारीत 30 गुणांची नोंद केली होती. अंतिम फेरीत कतारने 32/40 गुणांसह रौप्यपदक, तर चीनने 23 गुणांसह कांस्यपदक पटकावले.
नीरूचे दुसरे सुवर्ण
नीरू धांडाचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी तिने महिला ट्रॅपमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकत हिंदुस्थानचा प्रदीर्घ प्रतीक्षेचा कालखंड संपवला होता. आता अनुभवी नेमबाज 36 वर्षीय किनान चेनाई याच्या साथीने तिने मिश्र ट्रॅपमध्येही हिंदुस्थानला सुवर्ण मिळवून दिले.



























































