Konkan News – पावसाची दडी, मंडणगड तालुक्यात भातशेती पिक संकटात; वरकस भातशेतीच्या पिकांवर परिणाम दिसू लागला, शेतकरी धास्तावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंडणगड तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने विशेषतः वरकस भातशेती पूर्णपणे कोलमडून पडली आहे. यात विशेषतः वरकस (कातळावरील) जमिनीवरील पिके करपू लागल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने तब्बल २० ते ३० दिवस घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे भाताच्या लोंब्या भरण्याच्या प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे यंदा उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मंडणगड तालुक्यात खरीप हंगामात भातशेती बरोबरच नाचणी, वरी, तूर आदी विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात पर्जन्यमानाची स्थिती समाधानकारक राहिलेली नसल्याने त्याचा थेट परिणाम हा भातशेती पिकावर होताना दिसत आहे. सुरुवातीच्या काळात जून महिन्यात अत्यल्प केवळ सरासरी ४४८ मिमी. पावसाची नोंद झाली तर जुलै मध्ये यावर्षीच्या पावसाळी महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे एकूण सरासरी २२३०.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट मध्ये तीनही महिन्याचा सरासरी पाऊस केवळ २६७९.७५ मिमी एवढ्या पावसाची नोंद होती. आता सप्टेंबर महिन्यात चार महिन्यांचा सरासरी एकूण पाऊस २८२७.५ मिमी. एवढाच झाला आहे.म्हणजेच सप्टेंबर महिन्यात केवळ सरासरीने १४२ मिमी. पाऊस कोसळला. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडलाच नसल्याने भातशेती पिकाला पाण्याची कमतरता भासली.

विशेषतः वरकस भातशेतीत जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कातळ सदृष्य परिस्थितीमुळे तुलनेने कमी असते. त्यामुळे भातशेतीमध्ये पाणी साचून राहत नाही. भातशेतीसाठीची पाण्याची आवश्यकता पुर्ण होऊ शकल्यामुळे एकूणच पिकांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील अनेक भागातील गावा गावातील शेतकरी शेवटच्या टप्प्यातील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भात पिकासाठी कणसातील दाणे भरण्याच्या काळात आवश्यक तो पाऊस बरसलाच नसल्याने त्याचा थेट झालेला परिणाम हा भातशेतीवर दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ तालूके दुष्काळग्रस्त तालूके म्हणून शासनाने जाहीर केलेले असले तरी उर्वरित ६ तालुक्यातीलही परिस्थिती काही वेगळी नाही त्यामुळे उर्वरित मंडणगडसह दापोली ,गुहागर ,खेड ,चिपळूण आणि लांजा तालूके दुष्काळग्रस्त तालूके म्हणून शासनाने जाहीर करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे तेही काही चुकीचे नाही.मंडणगड तालुक्यातील पावसाची आणि पिकांची स्थितीही प्रशासनाने गांभीर्याने तपासणे आवश्यक असल्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पावसाने फिरवलेली पाठ तशीच ठेवली तर खरीप हंगामातील उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. यासंदर्भात

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे काम सुरु आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिकाच्या वाढीवर व उत्पन्नावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे त्यात पाणथळ शेती पेक्षा वरकस शेतीला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे
– सोमनाथ आहेरकर, तालुका कृषी अधिकारी, मंडणगड , जि.रत्नागिरी