
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये हिंदुस्थानची दमदार कामगिरी सुरू आहे. हिंदुस्थानने आतापर्यंत 10 सुवर्णपदकांसह एकूण 60 पदकांची लयलूट केली आहे. नेमबाजीसह हिंदुस्थानने एथलिटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती तामिळनाडूची धावपटू विथ्या रामराज हिची. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही पदकांना गवसणी घातली आहे.
विथ्या रामराज हिने महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक, तर मिश्र 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये रौप्यपदक आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे कांस्यपदक जिंकताने तिने नव्या विक्रमाचीही नोंद केली. तिने या शर्यतीमध्ये हिंदुस्थानच्या महान धापपटू पी.टी. उषा यांचा 42 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला.
विथ्याने महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत 54.75 सेकंदांची वेळ नोंदवली. पी. टी. उषा यांनी 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये 55.42 सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तीन वर्षांपूर्वी विथ्याने या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र, त्यानंतर हा विक्रम मोडण्याचा निर्धार तिने केला आणि अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला हा विक्रम मोडण्यात यश मिळाले. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे कोईम्बतूर जिल्ह्यातील मदुक्कराईजवळील मीनाक्षीपुरम या तिच्या गावात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी तिचे आई-वडील रामराज आणि मीना यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
विथ्याच्या यशामागे तिच्या आई-वडिलांचा मोठा त्याग आहे. विथ्या आणि तिची जुळी बहीण नित्या या दोघीही लहानपणापासूनच खेळात सक्रिय होत्या. त्यांना आणखी एक बहीण असून रामराज आणि मीना या दाम्पत्याला एकूण तीन मुली आहेत. रामराज यांनी पूर्वी ट्रकचालक म्हणून काम केले. मात्र, मुलींनी आपल्या पायावर उभे राहिल्यानंतर त्यांनी वाहनचालकाचे काम सोडले. सध्या ते मीनाक्षीपुरम येथे शेळीपालन करतात. आपल्या मुलींनी यशस्वी कारकीर्द घडवावी याचा त्यांना अभिमान आहे.
आई-वडिलांना परदेशात नेण्याची इच्छा
विथ्याची बहीण नित्या हिलाही खेळाची आवड असून सध्या ती प्राप्तिकर विभागात कार्यरत आहे. तर विथ्या क्रीडा कोट्यातून रेल्वेत नोकरी करते. काही दिवसांपूर्वीच विथ्याने आपल्या आई-वडिलांना विमानप्रवास घडवून आणला होता. आता त्यांना परदेशात घेऊन जाण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी तिने आई-वडिलांना पासपोर्ट तयार करून ठेवण्यास सांगितले आहे.
तामिळनाडू सरकारकडून बक्षिसाची घोषणा
विथ्याच्या कामगिरीचे तामिळनाडू सरकारनेही कौतुक केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी 75 लाख रुपये, तर कांस्यपदकासाठी 30 लाख रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.























































