पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आर्थिक पाठबळ द्या, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी युवासेनेचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैदानावर पदक जिंकून मुंबई विद्यापीठाचा झेंडा उंचावणाऱ्या गुणवंत खेळाडूंना आता केवळ कौतुकाची थाप नको, तर भक्कम आर्थिक पाठबळ द्या, अशी जोरदार मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी केली आहे.

देशाचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य सन्मान, नियमित विशेष निधी आणि मानधन मिळावे यासाठी युवासेनेने मुंबई विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले. आर्थिक अडचणींमुळे एखाद्या खेळाडूची कारकीर्द अर्ध्यावर थांबता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली.

राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी देऊन ‘कुलगुरू पदक’ उपक्रम सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानेही खेळाडूंसाठी स्वतंत्र आणि मजबूत आर्थिक व्यवस्था उभी करावी, अशी युवासेनेची मागणी आहे. यासाठी विद्यापीठाच्या सीएसआर निधीतून ‘सीएसआर स्टुडंट सपोर्ट फंड’ निर्माण करून क्रीडा, शिक्षण, संशोधन, सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. संधीच्या अभावामुळे एकही गुणवंत विद्यार्थी मुंबई विद्यापीठ सोडता कामा नये. विद्यापीठानेच त्यांच्या स्वप्नांना बळ द्यावे, अशी भूमिका युवासेनेने मांडली.

क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी यांना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, युवासेना सहसचिव व कॉलेज कक्षाचे सक्रिय सदस्य दुर्गेश वैद्य यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.