
तेलंगणातील चार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून रशियात नेण्यात आले. या ठिकाणी नोकरी देण्याऐवजी त्यांना युद्धात ढकलण्यात आले आहे, असा गंभीर आरोप या मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तेलंगणा सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे हस्तक्षेप करून तरुणांची सुरक्षित सुटका करून त्यांना तत्काळ हिंदुस्थानात परत आणावे, अशी मागणीही तरुणांच्या पालकांनी केली आहे.
निजामाबाद जिह्यातील भुक्या रविंदर, भुक्या अशोक, मेगावथ प्रकाश आणि कामारेड्डी येथील मोहम्मद अफजल खान हे चार तरुण फेब्रुवारी 2026 ला रशियाला गेले होते. त्यांना तिथे साफसफाई, सुरक्षा रक्षक, बागकाम आणि इतर सहाय्यक स्वरूपाच्या नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. एवढेच नव्हे तर काही तरुणांना थेट तेल कंपन्यांमध्ये उत्तम नोकरी मिळवून दिली जाईल, असे सांगण्यात आल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या सर्व नोकऱ्यांच्या आमिषापोटी एजंटने प्रत्येकाकडून तब्बल तीन लाख रुपयांची मोठी रक्कम उकळल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांकडून केला जात आहे. रशियात पोहोचल्यानंतर तरुणांना आश्वासन दिल्याप्रमाणे पगार मिळाला नाही. त्यानंतर त्यांना रशियन लष्कराशी संबंधित काम करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप आहे. तरुणांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांच्या हातात बंदुकाही सोपवण्यात आल्या.


























































