
पुणे जिल्ह्यात खून करून सातारा जिल्ह्यात मृतदेह आणून टाकल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या आव्हानात्मक मर्डर मिस्ट्रीचा सातारा पोलिसांनी 15 दिवसांत छडा लावला आहे. मुलीचा चुकीच्या वर्तनाला वैतागून बाप व चुलत्याने तिचा खून करून मृतदेह सातारा जिल्ह्यात आणून टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.
खंडाळा तालुक्यातील राजेवाडी येथे रस्त्यालगत 14 सप्टेंबरला अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला होता. शिरवळ ठाण्यात त्याबाबत नोंद झाली होती. मृत्यू संशयास्पद वाटत असल्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी तपास करण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने शिरवळ भागात ठाण मांडून अहोरात्र मेहनत घेतली. कोणताही धागादोरा नसताना वेळावेळी घटनास्थळाची पाहणी करून, तसेच पुणे, भोर बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्हींची पाहणी करून, तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली. तांत्रिक तपासाद्वारे खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता वापरलेल्या वाहनाचा शोध घेतला व त्याआधारे खून करणाऱ्यांना शोधून काढले.
हर्षदा हणुमंत जाधव (वय 19, रा. लक्ष्मीविष्णू पार्क, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील हणुमंत दामोदर जाधव व चुलत-चुलता बाळू अंकुश जाधव (रा. प्रगतीनगर, इंदोरी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी हर्षदाचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
मुलगी घरातील लोकांना शिवीगाळ करणे, वाईट मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरणे, व्यसन करणे, घरातील लोकांना खोटय़ा केसमध्ये अडकविण्याची धमकी देणे अशाप्रकारे त्रास देत असल्याच्या कारणावरून वडील व चुलते यांनी मुलीला हॉटेलला जेवण करण्यास जायचे असल्याचे सांगून गाडीतून बाहेर नेले. त्यानंतर डोळ्यात व तोंडात चटणी घालून हाताने तोंड व नाक दाबून तिचा खून केला. आरोपींना ताब्यात घेऊन शिरवळ पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शिरवळचे निरीक्षक महेश इंगळे, सहायक निरीक्षक अभिजित यादव, रोहित फार्णे, उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, अंमलदार अतिष घाडगे, राजू मुलाणी, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, हणमंत भोसले, अमोल माने, जयवंत खांडके, स्वप्नील कुंभार, स्वप्नील दौंड, विजय निकम, सहायक निरीक्षक किर्ती म्हस्के, नितीन खामगळ, प्रशांत धुमाळ, सुजर चव्हाण, अक्षय बगाड यांनी ही कामगिरी केली आहे.



























































