
लालबागचा राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव बुधवारी करण्यात आला. लिलावात तब्बल 85 वस्तूंची विक्री करण्यात आली. त्यातून 3 कोटी 22 लाख 28 हजार रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.
गणेशोत्सवात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांकडून राजाच्या चरणी विविध वस्तू अर्पण केल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दान केले आहे. लिलावात 85 वस्तूंची विक्री करण्यात आली. यात अनेक सोन्याचांदीचे दागिने, मोदक, चांदीच्या गदा, क्रिकेट बॅट आणि दोन मोटरसायकलचा समावेश होता. याशिवाय रोख रकमेच्या स्वरूपात दानपेटीत कोटय़वधी रुपये जमा झाले आहेत. लिलावातून जमा झालेल्या निधीतून मंडळातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
– विशेष म्हणजे, लिलावात एक किलो वजनाची सोन्याची वीट सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या विटेची 1 कोटी 55 लाख 50 हजार रुपयांना विक्री झाली. लिलावातील ही सर्वात महागडी वस्तू ठरली.





























































