
केंद्र सरकारने आगामी रब्बी हंगामातील सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गहू, हरभरा, बार्ली, मसूर, मोहरी आणि करडई या पिकांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन दर वाढीनुसार गव्हाची आधारभूत किंमत प्रती क्विंटल 2610 रुपये तर हरभऱयाची 5928 रुपये प्रती क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय बार्लीसाठी 2286 रुपये, मसूरसाठी 7390 रुपये, मोहरीसाठी 6613 रुपये आणि करडईसाठी 7215 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे. यंदाच्या एमएसपी वाढीमध्ये सर्वाधिक वाढ करडई आणि मसूरच्या दरात झाली असून प्रति क्विंटल 675 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर मोहरीच्या दरात प्रति क्विंटल 413 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
7.31 लाख कोटी रुपयांची वाढ
2004-05 ते 2013-14 या कालावधीत सहा रब्बी पिकांसाठी शेतकऱयांना देण्यात आलेल्या किमान आधारभूत किमतीचे एकूण मूल्य 2.65 लाख कोटी रुपये होते. त्यांनतर 2014-15 ते 2025-26 या कालावधीत हे मूल्य वाढून 8.36 लाख कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत 7.31 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.




























































