पवई तलाव झाले स्वच्छ आणि सुंदर; सांडपाण्याचे प्रवाह रोखण्याचे काम 100 टक्के पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवई तलावात जाणारे सांडपाणी थांबवण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. मलजलाच्या 20 प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून ते भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे (एसटीपी) वळविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामांतर्गत एकूण 3 हजार 56 मीटर लांबीच्या नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून पवई तलावात मलजल मिसळले जाणार नाही. परिणामी पवई तलाव प्रदूषणमुक्त होणार आहे.

पालिकेच्या वतीने पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पवई तलावात येणाऱ्या मलजलाच्या प्रवाहास प्रतिबंध करणे तसेच मलजल प्रक्रिया केंद्रामार्फत मलजलावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे, ही प्रमुख कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत.

पवई तलावाची निर्मिती 1891 साली झाली असून ते 223 हेक्टर परिसरात विस्तारलेले आहे. जवळपास 6.6 किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 600 हेक्टरवर पसरले असून तलावाची क्षमता ही सुमारे 5 हजार 455 दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. पवई तलाव परिसरात वाढलेले नागरीकरण आणि तलावामध्ये दररोज येणारे सुमारे 18 दशलक्ष लिटर मलजल यामुळे जल प्रदूषण होते.

पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प आणि मुंबई मलनिस्सारण विल्हेवाट प्रकल्प या विभागांनी तलावात मलजल मिसळणाऱ्या एकूण 20 विसर्ग बिंदूंची पाहणी केली. पवई तलावात येणाऱ्या मलजल प्रवाहास प्रतिबंध करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत 18 मलजल प्रवाह ‘इंटरसेप्ट’ करून ते गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे (एसटीपी) वळविण्याचे काम 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे.