
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल 97.27 टक्के गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन झाले. पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या 383 कृत्रिम तलावांमध्ये हे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेल्या आवाहनाला गणेशभक्त आणि गणेश मंडळांनी उदंड प्रतिसाद दिल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई आणि उपनगरांत एकूण 1 लाख 97 हजार 382 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी सहा फुटांपर्यंतच्या एपूण 1 लाख 92 हजार 237 गणेशमूर्तींचे 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. यामध्ये 1 लाख 22 हजार 391 पीओपी मूर्ती आणि 69 हजार 846 शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे. तर सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या 5 हजार 382 श्रीगणेशमूर्तींचे 67 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जन करण्यात आले. यामध्ये 5,259 पीओपी आणि 123 शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे.
पालिका प्रशासनाने यंदा 383 कृत्रिम तलाव तसेच समुद्रकिनारे, चौपाटय़ा आणि अन्य ठिकाणी 67 नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध करून दिली होती. सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता.





























































