रानोमाळ रखरख, पक्ष्यांचे निस्तेज थवे… 49 लाख हेक्टरवरील खरीप गेला, रब्बीचा दाणाही येणार नाही; मराठवाड्याचे दुष्काळाने वाटोळे केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उदय जोशी

रानोमाळ पसरलेली रखरख, आकाशाकडे चोची करून बसलेले पक्ष्यांचे निस्तेज थवे, पाण्याचा टिपूसच काय, मृगजळही दृष्टीला पडणार नाही असा पेटलेला दुष्काळवणवा ! पावसाने केलेल्या दगाबाजीमुळे मराठवाड्यातील ४९ लाख हेक्टरवरील खरिपाचे वाळवंट झाले असून २३ लाख हेक्टरवरील रब्बीचा एक दाणाही येण्याची खात्री नाही. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही अन् हाताला काम नाही! लेकी उजवायच्या कशा, कर्ज फेडायचे कसे आणि पोट भरायचे कसे… या प्रश्नांनी जर्जर झालेल्या शेतकऱ्यांना आता मरण जवळचे वाटत आहे. गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

गेली तीन वर्षे मेहेर करणाऱ्या पावसाने यंदा मराठवाड्याकडे पाठच फिरवली. अनिनोचा प्रभाव असल्यामुळे पर्जन्यमान कमी असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. कृषी खात्यानेही शेतकऱ्यांनी पेरणी जरा सबुरीनेच करावी, असा सल्ला दिला होता. पण पाऊस आला. मृगबहार झाली. जूनमध्ये बरा पाऊस पडला. मात्र त्यानंतर पावसाने अधूनमधून हजेरी लावली. ऑगस्ट, सप्टेंबर तर कोरडाच गेला. जमिनीतील ओलीच्या आधारावर कसाबसा तरलेला खरीप पावसाच्या ओढीमुळे करपून गेला.

परतीच्या पावसानेही दगा दिला

मराठवाड्यात खरिपाचे क्षेत्र साधारण ४९.७२ लाख हेक्टर एवढे आहे. त्यात जवळपास २३ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते, तर १५ लाख हेक्टरवर कापूस घेतला जातो. उर्वरित क्षेत्रात मका, तूर, मूग, उडीद, बाजरी घेतली जाते. पाऊसच नसल्यामुळे सोयाबीन वाळून गेले आहे. कापूस खुरटला असून त्याला वेगवेगळ्या रोगांनी वेढले आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. परतीच्या पावसाच्या भरवशावर रब्बीचा हंगाम घेतला जातो. पण परतीचा पाऊसही बरसला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची आशाही मावळली आहे.

उधारीवर जायकवाडी मालामाल!

मराठवाड्यातील पाच जिल्हयांची तहान भागवणारे जायकवाडी उधारीवर मालामाल झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा थेंबही पडला नाही, परंतु वरच्या भागातून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडीत ८० टक्के पाणीसाठा आहे. मात्र मराठवाड्यातील मांजरा, तेरणा, सीना कोळेगाव, निम्न दुधनासह सर्व लहानमोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. मांजरा धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा आहे, तर सीना कोळेगावचे वाळवंट बनले आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी कोठून आणायचे, असा गंभीर प्रश्न आहे. पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी विभागातील ५०० पेक्षा जास्त विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून २०० पेक्षा जास्त गावांना सध्या टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे. एकट्या बीड जिल्हयात १२० प्रकल्पांमध्येही पाण्याचा थेंबही नसल्यामुळे अत्यंत भयावह परिस्थिती बघायला मिळत आहे.

जल अर्पण कार्यक्रमासाठी गावच सापडेना

गावखेडे बाबतीत ग्रामीण भागातील दुर्गम आणि पिण्याच्या पाण्याच्या स्वावलंबी व्हावेत, स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी त्यांना मिळावे यासाठी केंद्र सरकारने बीड जिल्ह्यातील ४८० गावात दोन हजार कोटी रुपये खर्च करून जलजीवन योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वतीने सेवा संकल्प अभियान राबवण्यासाठी जिल्हाभरातून एक गाव निवडायचे आणि त्या गावामध्ये जल अर्पण उपक्रम राबवायचा आहे. २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी गाव शोधताना जिल्हा प्रशासनाच्या तोंडाला फेस आला. कारण दोन हजार कोटी कागदोपत्री खर्च झालेत, पण प्रत्यक्षात काम कोणत्याही गावात झालेले नाही. अखेर ४८० गावांचा फेरफटका मारल्यानंतर वडगाव येथे थोडेफार काम झाल्याचे दिसून आले. त्या गावात आता जल अर्पण कार्यक्रम होणार आहे.