बारदरीवर दुष्काळाची छाया; आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा, तलाव आटण्याच्या मार्गावर; पिके करपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद देखणे

अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारदरी गावात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. ज्या गावात आजवर पाण्याची कधीच कमतरता भासली नाही. तेथील प्रमुख तलाव आता आटण्याच्या मार्गावर आहे. गावात पिण्यासाठी जेमतेम आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शेतातील पिके करपून गेली आहेत. जनावरांसाठी चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, शाळांनाही पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. त्यामुळे पाणी मिळाले नाही तर गाव सोडण्याशिवाय पर्याय काय? असा सवाल गावकरी विचारत आहेत.

1972च्या दुष्काळाची आठवण करून देणारी परिस्थिती सध्या बारदरीमध्ये निर्माण झाली आहे. गावची लोकसंख्या वाढून सुमारे 1500वर पोहोचली असताना पाण्याचे प्रमुख स्रोत कोरडे पडू लागल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी, जनावरांचे संगोपन, शेती आणि रोजगार या चारही आघाडय़ांवर मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. आजच ही अवस्था असेल तर पुढील आठ महिने कसे काढायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकरी व ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे.

गावाची जीवनवाहिनीच धोक्यात

बारदरी गावातील तलावात मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा होता. याच पाण्यावर गावातील पिण्याचे पाणी, शेती तसेच जनावरांच्या पाण्याची गरज भागत होती. या तलावाचा फायदा मेहेकरी, रथळगाव, लमानतांडा, सोनेवाडी यांसह परिसरातील इतर गावांनाही होत होता. मात्र, आता बारदरीतच पाणी शिल्लक नसल्याने इतर गावांना पाणी देण्याचा प्रश्नच निर्माण झाला आहे. तलावातील पाणी झपाटय़ाने कमी होत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढत आहे. तलावातील तळ दिसू लागला, पिके आडवी पडली आणि जनावरांसाठी चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाल्याची विदारक स्थिती आहे.

पिके करपली; हातात काहीच नाही

यंदा कमी पर्जन्यमानाचा सर्वाधिक फटका बारदरी परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. खरिपाची पिके अपेक्षेप्रमाणे हाताला लागलेली नाहीत. त्यात आता पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने उरलेली पिकेही वाचविणे अशक्यप्राय बनले आहे. शेतीत उत्पन्न नाही, जनावरांसाठी चारा नाही आणि घरात पिण्याचे पाणीही अपुरे, अशी तिहेरी कोंडी शेतकरी व शेतमजुरांची झाली आहे.

आता रोजगार तरी द्या!

पाण्याअभावी पिके करपली आहेत. तलावातील पाणी संपत चालल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. शेतमजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी युवराज पोटे, सुधीर पोटे आणि तुषार पोटे यांनी केली आहे.

गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव आटत चालला आहे. सध्या केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. शासनाने तातडीने गावाची प्रत्यक्ष पाहणी करून गावासाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.

– सुरेखा पोटे, सरपंच बारदरी.