शिवसैनिकांची मानपाडा पोलीस ठाण्यावर धडक; ‘सामना’च्या मास्टरहेडचा अनधिकृत वापर, दिनेश कवचेवर कारवाई करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनिक ‘सामना’च्या मास्टरहेडचा अनधिकृत वापर करणाऱ्या दिनेश कवचे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली. दैनिक ‘सामना’शी कोणताही संबंध नसताना कवचे याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आणि पत्रव्यवहार करताना ‘सामना’च्या मास्टरहेडचा वापर करून वाचकांची दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केला आहे.

दैनिक सामना हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र आहे. त्यामुळे ‘सामना’च्या मास्टरहेडचा गैरवापर करणे हा प्रकार गंभीर असल्याने दिनेश कवचे याची कसून चौकशी करण्यात यावी आणि त्याच्यावर कठोर करवाई व्हावी, अशी मागणी यावेळी जिल्हा युवाधिकारी प्रतीक पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्याकडे केली.

याप्रसंगी जिल्हा समन्वयक सुधीर पाटील, उपजिल्हाप्रमुख विलास म्हात्रे, डोंबिवली पूर्व शहरप्रमुख कुणाल ढापरे, डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख सुरेश परदेशी, शहर संघटक अक्षरा पटेल, विधानसभा युवाधिकार आदित्य पाटील, उपशहरप्रमुर जगदीश जुलूम, संजय मांजरेकर प्रमोद कांबळे, उपतालुकाप्रमुख अॅड किरण पाटील, माजी नगरसेवक भाल चंद्र म्हात्रे, विभाग युवाधिकारी सचिन पाटील, उपविभाग युवाधिकारी वरुण चौहान, शाखा युवाधिकारी अनुज मोरे, माजी शहर युवाधिकारी प्रसा टुकरूल आदी उपस्थित होते.

दिनेश कवचे याने ‘सामना’च्या मास्टरहेडचा संकेतस्थळे, सामाजिक माध्यमांवरील पोस्ट, पत्रव्यवहार करताना बेकायदा वापर केला आहे. त्यामुळे या सर्वच साहित्याची कसून तपासणी करण्यात यावी आणि पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती शिष्टमंडळाला देण्यात यावी, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.