पाकिस्तानी सैन्याकडून अफगाणिस्तानात हवाई हल्ला, कुनार आणि हेलमंदमध्ये 9 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानने अफगाणिस्तानातील कुनार आणि हेलमंद प्रांतांमध्ये पुन्हा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही भागांतील नागरिकांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 9 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात तीन घरेही उद्धवस्त झाली आहेत, असे एका अफगाण प्रवक्त्याने सांगितले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कुनारच्या शेल्टन जिल्ह्यातील चोगाम खोऱ्यात एका घरावर बॉम्ब हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हेलमंदच्या गरमसिर जिल्ह्यातील सफार भागातील नागरिकांच्या घरांनाही हवाई हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले.

हल्ल्यानंतर, ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. या घटनेनंतर पाकिस्तानविरोधात स्थानिक लोकांमध्ये संतापही निर्माण झाला आहे. कुनार आणि हेलमंदमधील या हल्ल्यांनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे.