
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयावह झाली असून, अवघ्या चार दिवसांत दोन शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. उत्तर सोलापुरातील बीबीदारफळ येथे 18 वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने दुष्काळामुळे बसलेला फटका, जर्सी गायींचा मृत्यू आणि विहिरीच्या आटलेल्या पाण्याच्या विवंचनामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेश अनिल खरात असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे राहणारा प्रथमेश अनिल खरात (वय 18) हा गेल्या दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या मृत्यूनंतर शेती करीत होता. घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. शेतीसाठी त्याने कर्ज काढले होते. 15 दिवसांपूर्वी सर्पदंशाने त्याच्या दोन जर्सी गायी मृत्युमुखी पडल्या, तर दुष्काळामुळे विहिरीचे पाणी आटले होते. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. या तणावातून त्याने मध्यरात्री शेतातच ओढणीने गळफास घेतला.
ही घटना कळताच, त्याचे चुलते सुनील खरात यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यात कर्जबाजारी व नापिकीमुळे सुभाष भानुदास माळी या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या या आत्महत्येने जिल्हा हादरला आहे.





























































