स्वाईन फ्ल्यूचे कोल्हापुरात 176, सांगलीत 8 रुग्ण; आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यांत स्वाईन फ्लूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आजअखेर कोल्हापूर जिल्ह्यात 176, तर सांगली जिह्यात आठ स्वाईन फ्लू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले.

स्वाईन फ्लू हा इन्फ्ल्यूएन्झा एच-1 एन-1 विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. खोकताना, शिंकताना वा बोलताना हवेतून बाहेर पडणाऱया थेंबांद्वारे तसेच संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कातून या आजाराचा प्रसार होऊ शकतो. संक्रमित वस्तू वा पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केल्यानेही संसर्ग होण्याची शक्यता असते.

स्वाईन फ्लूची लक्षणे साधारणतः एक ते चार दिवसांत दिसून येतात. ताप, खोकला, घसा खवखवणे वा दुखणे, नाक वाहणे, सांधे व स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा ही प्रमुख लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये श्वसनास त्रास वा निमोनियासारखी गंभीर लक्षणेही दिसून येऊ शकतात.

नागरिकांनी सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, नियमितपणे साबणाने हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा. आजारी व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवावे, अनावश्यक गर्दी टाळावी तसेच स्वच्छ व ताजे अन्न सेवन करावे. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घ्यावा. आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोल्हापूर मनपा क्षेत्रात 10 रुग्ण

कोल्हापूर शहरातही स्वाईन फ्लू (एच-1, एन-1/इन्फ्लूएंझा)चे एकूण 10 सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता व काळजी घेऊन स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व 28 उपकेंद्रे कार्यरत आहेत.